प्रतिनिधी / धाराशिव
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 15 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. यावर्षी नवरात्र काळात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून,त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांनी पत्रकारांना सांगितले.त्यांनी आज तुळजापुरात तयारीची पाहणी केली तसेच विविध खात्याच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली.
पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे म्हणाले,
नवरात्र महोत्सवात गेल्या वर्षीच्या अनुभवावरून दुर्गा आष्टमी आणि पोर्णिमेला होत असलेली भाविकांची सर्वाधिक गर्दी विचारात घेऊन नियोजन केले जात आहे. ते म्हणाले की, नगर पालिकेची सर्व निविदा प्रक्रीया जवळपास अंतिम टप्प्यात असून, याशिवाय भाविकांच्या सुविधेसाठी शहरात सर्वत्र सुचना फलक लावण्यात येणार आहेत. शहरात सर्वत्र आरोग्य विभागाची पथके तैनात राहणार आहेत. दरम्यान त्यांनी आढावा बैठकीनंतर हडको, १२४ भक्त निवास, धाराशिव रोड वाहनतळ तसेच आपसिंगा रोड वाहनतळ आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार अरविंद बोळंगे, व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ माळी, मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, अभियंता अशोक सनगले आदींची उपस्थिती होती.
बाहेरून आलेल्या वाहनचालकासाठी “क्यु आर कोड” स्कॅन केल्यावर डायव्हर्जनची माहिती समजणार आहे. मंदिराजवळ हडको मैदान, १२४ भक्त निवास, टेलिफोन ऑफिस आदी ठिकाणी ३० हजार वाहनांचा पार्किंगचे नियोजन, प्रत्येक ठिकाणी पोलीस मदत कक्ष, ३ भाषेत भाविकांसाठी सुचना, मंदिर तसेच शहरातील सर्व ठिकाणी सिसिटीव्ही बसविण्यात येणार आहेत,असे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
6 ऑक्टोबरपासून मातेची मंचकी निद्रा
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा 6 ऑक्टोबर रोजी सुरू होईल. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी पहाटे मातेची सिंहासनावर प्रतिष्ठपणा होऊन दुपारी बारा वाजता घटस्थापना होईल. त्यानंतर घरोघरी घटस्थापना होईल.भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी मंदिर प्रशासन आणि तुळजापूर नगर परिषदेकडून युद्धपातळीवर नियोजन सुरू असून,विविध खात्यांची मदत घेतली जात आहे. दरम्यान, पोलीस विभागाकडून सुरक्षेच्या दृष्टीने तसेच गर्दीच्या नियोजनासाठी स्वतंत्र तयारी करण्यात येत आहे. एसटी महामंडळ आणि आरोग्य विभागही तयारी करत आहे.