प्रतिनिधी / तुळजापूर
तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. कारण आराखडा अंतिम होण्यापूर्वी घेतलेल्या सादरीकरण बैठकीत खुद्द संबंधित कंपनीला नीटपणे सादरीकरणही करता आले नाही. त्यामुळे आराखड्यात बऱ्याचअंशी गोंधळ दिसून आला तर स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा आराखड्यात समावेश करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आराखडा अंतिम होण्यासाठी आणखी किती कालावधी जाणार,असा प्रश्न विचारला जात आहे.
राज्यातील अन्य तिर्थक्षेत्राचा विकास होत असताना तुळजापूर तिर्थक्षेत्राचा विकास रखडला असून, तुळजापूर विकास आराखडा कधी अंमलात येणार की विकास आराखडा मृगजळ ठरणार,असा प्रश्न ‘आरंभ मराठी’ने उपस्थित केला होता. त्यानंतर आराखड्याच्या अनुषंगाने मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी आराखड्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी तुळजापूरला अभियांत्रिकी महाविद्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विविध खात्याचे अधिकारी, स्थानिक नागरिक, व्यापारी, पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याचे कंपनीकडून सादरीकरण करण्यात आले. यावेळी शहरातील शुक्रवार पेठ, कमानवेस भागातील भाविकांसाठी महाद्वार परिसरात दर्शन मंडप उभारण्याची मागणी पुजाऱ्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुचनांचा विचार करण्याचे आश्वासन दिले.
विकास आराखड्याचे सादरीकरणाचे नियोजन चुकल्याने पुजारी तसेच नागरिकांना आराखडा समजण्यास अडचणी येत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ.ओंबासे यांनी हस्तक्षेप करत स्वतः खुलासा केला. मात्र सल्लागार कंपनीचे अभियंता आराखडा समजावून सांगण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे आराखड्यात अजून गोंधळ असल्याचे दिसून आले.
यावेळी जिल्हाधिकारी डाॅ.ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, तहसीलदार अरविंद बोळंगे, मंदिर संस्थानचे लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, अभियंता राजकुमार भोसले आदींची उपस्थिती होती. दुपारी १२ ते ३ या कालावधीत विस्तृत सादरीकरण करण्यात आले. यावेळी पुजारी मंडळ, व्यावसायिक, नागरिकांनी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी डाॅ. ओंबासे यांना दिले. यावेळी तिन्ही पुजारी मंडळाचे पदाधिकारी, महंतासह माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, किशोर गंगणे, डाॅ. सतीश कदम, हेमंत कांबळे, इंद्रजीत साळुंके, कुमार टोले आदींची उपस्थिती होती.