प्रतिनिधी / तुळजापूर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मौल्यवान प्राचीन अलंकार गहाळ प्रकरणात आता फेरमोजणी सुरू करण्यात आली असून, बुधवारी दिवसभरात एक पेटी मोजून पूर्ण झाली. यावेळी मोजणी अहवाल अचूक यावा, यासाठी जुन्या संदर्भाचा आधार घेतला जातो आहे. म्हणजेच 1975 सालच्या फोटो अल्बममधून दागिन्यांची मोजदाद केली जात आहे. यामुळे सध्याचे आणि 48 वर्षांपूर्वीचे दागिने याचा ताळमेळ लावणे शक्य होणार आहे.
गेल्या आठवड्यात दिलेल्या मोजणी अहवालावरून तुळजाभवानी मातेचे प्राचीन मौल्यवान अलंकार गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता.त्यानंतर सगळीकडे गहाळ दागिन्यांच्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत होती. त्यामुळे मंदिर संस्थानने पुन्हा एकदा दागिन्यांचा तपास घेण्यासाठी दागिन्यांची फेर मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी इन कॅमेरा ही मोजणी सुरू झाली असून, बुधवारी एका पेटीतील दागिन्यांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल मंदिर प्रशासनाला सादर करण्यात आला.
दर्शन मंडपातील मोजणी कक्षात सकाळी ११ वाजता अलंकार मोजणीची सुरुवात करण्यात आली. ईन कॅमेरा सिसिटीव्ही कॅमेऱ्याच्या निगरानीत दुपारी ३ च्या सुमारास १ नंबर डब्यातील अलंकाराची मोजणी संपली. य नंतर मोजणीचा अहवाल सादर करण्यात आला. यावेळी उमरग्याचे उपविभागीय अधिकारी गणेश पवार, नायब तहसीलदार अमित भारती यांचा सह महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष, सोनार, मोडी व उर्दू लिपी जाणकार आदी समिती सदस्यांची उपस्थिती होती. तुळजाभवानी मातेचा प्राचीन व मौल्यवान अलंकाराचे एकूण ७ डबे आहेत. यामध्ये शिवकालीन अलंकाराचा समावेश आहे. दिपावली पाडवा, दसरा, गुढीपाडवा, रथसप्तमी, अक्षय तृतीया आदी सण उत्सवाला तुळजाभवानी मातेची विशेष अलंकार पुजा मांडली जाते.