शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
आरंभ मराठी / तुळजापूर
जिल्हाभर धुमाकूळ घातलेल्या बिबट्याने आता तुळजापूर तालुक्यात एंट्री केली असून, तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील शेतकरी ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या गाईच्या वासरावर बिबट्याने सोमवारी रात्री हल्ला केला आहे.यामध्ये वासरू ठार झाले असून, बिबट्याच्या दहशतीने शेतकरी भयभीत झाले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात बिबट्या व वाघाने सध्या थैमान घातले असून, सोमवारी रात्री तुळजापूर तालुक्यातील कामठा येथे शेतकरी ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या गोठ्यातील गाईचे वासरू बिबट्याने ठार केले.
साळुंखे यांचा गोठा हा कामठा येथील फॉरेस्टच्या जवळ आहे.त्यामुळे झाडीतून येऊन बिबट्याने वासराला ठार केले असावे, असे सांगितले जात आहे. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील वन विभागात केले आहे.
याबाबत वनविभागाचे पथक तातडीने दाखल झाले असून, त्यांनी मृत गाईचा पंचनामा देखील केला आहे.
येडशी परिसरात सध्या वाघ आलेला असून, दुसरीकडे तुळजापूर मध्ये देखील हिंस्र प्राण्याचा वावर आहे. कामठा येथे वासरावर केलेला हल्ला वाघाने तर केला नसेल ना अशीही शंका शेतकरी व्यक्त करत आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्या आहे की वाघ आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.