मुंबई :- २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर तत्कालीन शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडीकरत सत्ता स्थापन केले. मात्र अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी करून उद्धव ठाकरेंचे(Uddhav Thackeray) सरकार पाडले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाशी केलेली युती आणि आता चार दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिवसेना-भाजप महायुतीत केलेल्या प्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलले आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. ही बॅनरबाजी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे.
मनसेकडून उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेला असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांची भेट घेतली.
दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राजकीय वर्तुळातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असून राज्यात आणखी नवीन राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.