प्रतिनिधी/ धाराशिव
उसाला चांगला भाव देण्याचा शब्द अनेक कारखानदार देतात आणि काहीजण तो शब्द पाळतात सुद्धा. पण पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी तेरणा साखर कारखाना सुरू करताना भावाची स्पर्धा करण्याचे आव्हानच ईतर कारखान्यांना दिले आणि सर्वाधिक भाव देऊन पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग देखील केली आहे. शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून तेरणा कारखान्याने 2825 रुपये प्रतिटन इतकी रक्कम जमा केली आहे. त्यामुळे डॉ. तानाजी सावंत यांचा कारखाना पुढच्या काळातही सर्वाधिक भाव देऊन अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे.
ढोकी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. संचालित तेरणा शेतकरी सह. साखर कारखान्याच्या ऊस बिलाचा पहिला हप्ता 2,825 रुपये बँकेत 4 डिसेंबर रोजी वर्ग करण्यात आला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे आरोग्य मंत्री मा. तानजी सावंत यांनी यापूर्वी 12 वर्षे बंद असलेला तेरणा शेतकरी सह. साखर कारखाना चालविण्यासाठी घेऊन जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या तसेच कारखाना व्यवस्थापनातील कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत, कार्यकारी संचालक विक्रम (केशव) सावंत यांनी विशेष परिश्रम घेऊन अल्पावधीतच कारखाना मशीनरी मेंटनन्सची कामे यशस्वीरित्या पूर्ण करून ऑक्टो-23 मध्ये कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ पार पडला.
14 नोव्हेंबर रोजी कारखान्याच्या प्रत्यक्ष ऊस गाळप हंगामाला यशस्वी रित्या सुरुवात झाली आहे. पालकमंत्री व कारखाना व्यवस्थापनाने चालू गळीत हंगामसाठी शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतीटन 2,825 रुपये जाहीर केली होती. तोच शब्द पाळत जयवंत मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी मार्फत कारखाना साईट तेरणा नगर ढोकी येथून शेतकऱ्यांना ऊस बिलाची पहिली उचल 2825 रुपयांनुसार रक्कम अदा करण्यास आल्याची माहिती विक्रम ( केशव ) सांवत यांनी दिली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यानी भैरवनाथ शुगर वर्क्स लि, संचालित तेरणा शेतकरी सहकारी साखर लि तेरणा नगर ढोकी कारखान्यास अधिकाधिक ऊस देऊन चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.