जबाबदारी कोणाची..? दुर्घटना रोखण्यासाठी काळजी घेण्याची गरज
शाम जाधवर / कळंब
शहरातील सर्वात मोठी असणारी शाळा म्हणजेच विद्याभवन हायस्कुल. बायपास रोड वर ही शाळा आहे आणि याच शाळेच्या आजूबाजूला जवळपास ३ ते ४ वेगवेगळी शिकवणी क्लासेस आहेत. सकाळी ६ ते दुपारी ४ पर्यंत हजारो विद्यार्थ्यांची ये-जा याच बायपास रस्त्यावरून होते. बायपास रस्त्यावर शाळेच्या परिसरात एकही गतिरोधक किंवा साधा सूचना फलकही उपलब्ध नाही. त्यामुळे कळंब बायपास रोडवर सतत अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात अल्पवयीन वाहन चालवणाऱ्यांची संख्या अधिक आहे हे विशेष. एखादी मोठी दुर्घटना घडण्याचा अगोदर शहर पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
स्थळ विद्याभवन हायस्कुल समोरील बायपास रस्ता, वेळ – सकाळी सातची, १५-१६ वर्षांची कोवळी पोरं… एक दुचाकी (गियर वाली) अन एकाच दुचाकीवर तिघेजण बसलेले. गाडीची गती ८० पेक्षा जास्त..त्यांच्या जोडीला आणखी एक दुचाकी त्यावरही तिघेजण विराजमान आणि मोठ्याने हॉर्न वाजवत एकमेकांना मागे टाकण्यासाठी त्यांची सुरु झालेली जीवघेणी स्पर्धा..
कळंब मधील बायपास रस्ता, तांदुळवाडी रोड येथील रंगीला चौक या ठिकाणी असे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. १८ वर्षांखालील मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही म्हणजेच त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसतेच, तरीही आपल्या लाडक्यांना गाडी चालवण्यास दिल्या जातात, त्यामुळे पालक याबाबत गंभीर का होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो.
मुलगा ९ वी किंवा १० वी ला गेला की, आपला मुलगा आता मोठा झालाय त्याचा गाडीचा हट्ट पुरविणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. काहीशा अशा जणू विचाराने अविर्भावात पालक आपल्या मुलांचा हट्ट पुरवितात. परंतु त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.
काय सांगतो कायदा?
■ज्या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही अशा व्यक्तीस वाहन चालविण्यास दिल्यास (कलम १८१) :- वाहन मालकास ३ महिने कैद, १ हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
■ दुचाकी वाहनांच्या मागील बाजूस बसणे (कलम १२८):- दुचाकी वाहन चालकाने आपले वाहनाचे मागील सीटवर एकापेक्षा अधिक व्यक्ती नेऊ नयेत.
■अनावश्यक हॉर्नचा वापर :- चालकाने गरज नसताना व आवश्यकतेपेक्षा अधिक हॉर्नचा वापर करता कामा नये. हॉर्न सतत दाबून धरणे गुन्हा आहे. विविध आवाजाची धुन असणारे (जनावरांचे आवाज, मुलाच्या रडण्याचे आवाज, रिव्हर्ज हॉर्न) हॉर्न वाजविण्यास बंदी आहे.
■२०१९ चा सुधारित मोटर व्हेईकल्स ॲक्ट म्हणून, पहिल्या अपराधासाठी इन्श्युरन्सशिवाय वाहन चालविण्यासाठी दंड रु. २००० आणि त्यानंतरच्या अपराधासाठी रु. ४००० आहे. यामुळे कायद्याच्या विवेकबुद्धीनुसार ३ महिन्यांसाठी कारावासही होऊ शकतो. “इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवणे” या अपराधासाठी कलम १९६ नुसार वरील दंड लागू आहे.
अल्पवयीन मुलांवर कारवाया केल्या
यापूर्वीही अशा वाहनांवर आम्ही कारवाया केलेल्या आहेत. पालकांनीही कायद्याचे भान ठेऊन आपल्या लहान मुलांकडे वाहन देणे टाळले पाहिजे. लहान मुलांकडे वाहन दिसल्यास त्यासाठी आम्ही पालकांना जबाबदार धरून पालकांवर कारवाई करणार आहोत.
– सुरेश साबळे, पोलीस निरीक्षक, कळंब
रोटरी लावणार फलक
अपघात टाळण्यासाठी विद्याभवन हायस्कुल आणि बायपास रोडवर “पुढे शाळा आहे वाहने सावकाश चालवा” असे फलक रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी मार्फत लावण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लवकरच याची पूर्तता होईल.
– रवी नारकर, अध्यक्ष, रोटरी क्लब, कळंब