सौर ऊर्जा कंपनीच्या त्रासाला शेतकरी वैतागले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
आरंभ मराठी / तामलवाडी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरण ताजे असतानाच तुळजापूर तालुक्यात पवनचक्की पाठोपाठ सौर ऊर्जा कंपनीनेही धुडगूस माजवला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी न करताच बळकावण्याचा प्रयत्न केला जात असून, शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करुन कंपाउंड मारले जात आहे. याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना खासगी बाउन्सर्स आणून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये एन.सी दाखल करण्यात आली असून, शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
तुळजापूर तालुक्यातील दहिवडी शिवारात इनरीच सोलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. इनरीच सोलर कंपनीने काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी न करताच बळकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. दहिवडी येथील गीतांजली शिवशंकर गाटे या महिला शेतकरी असून त्यांची दहिवडी शिवारात गट नंबर 143 मध्ये 10 एकर शेतजमीन आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून असून शेती कसून त्या कुटुंबाची उपजीविका भागवतात. असे असताना, इनरीच सोलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण केले असून कंपाउंड मारण्यासाठी जमिनीवर खड्डे खोदले आहेत. इनरीच सोलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने त्यांच्या बाजूला असलेल्या गट नंबर 141 मधील सुनील भालशंकर या शेतकऱ्याची जमीन खरेदी करून त्यावर सौर ऊर्जा प्लांट उभारला जात आहे. त्याच गटात वॉल कंपाउंड चे काम करणे गरजेचे असताना संबंधित कंपनीने शेजारील गटात वॉल कंपाउंडचे काम सुरु केले आहे. आमच्या शेतात तुम्ही आम्हाला न विचारता काम कसे सुरु केले असे विचारला गेले असता संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व खाजगी बाउन्सर्सनी तुम्ही आमचे काम नाही होऊ दिले तर तुम्हाला सगळ्यांना जिवे मारून टाकू असे म्हणत गीतांजली शिवशंकर गाटे या महिला शेतकऱ्याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याचे धमकी दिली. गीतांजली शिवशंकर गाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी रिया देशमुख, तुकाराम राठोड, डी.एस.चव्हाण, दिपक नलावडे सर्व राहणार सोलापूर यांच्या विरोधात तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये एन.सी दाखल करण्यात आली आहे.
सौर ऊर्जा व पवनचक्की कंपनीची दादागिरी वाढली
तुळजापूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असल्यामुळे व दळवणवळणाची योग्य ती सोय असल्यामुळे तुळजापूर तालुक्याला सौर ऊर्जा कंपनीने व पवनचक्की कंपन्यांनी वेढा घातला आहे. स्थानिक गुंडाना हाताशी धरुन शेतकऱ्यांच्या जमिनीला कवडीमोल भाव देत शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. येणाऱ्या काही दिवसांत तुळजापूर तालुक्यातही मुळशी पॅटर्न सारख्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खासगी बाउन्सर्स आणून शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकार वाढले
सौर ऊर्जा व पवनचक्की कंपनीच्या कामाविरोधात कोणी तक्रार केली किंवा कोणत्या शेतकऱ्यांनी काम आडवले तर त्यांना मारहाण करण्यासाठी किंवा धमकवण्यासाठी खासगी बाउन्सर्सला बोलावले जात आहे. ज्या ठिकाणी पुरुष शेतकरी विरोध करत असेल त्या ठिकाणी महिला बाउन्सर्स व महिला कर्मचाऱ्यांना पुढे केले जाते जेणेकरून शेतकऱ्यांना काही करता येऊ नये. संपूर्ण तालुक्यामध्ये खासगी बाउन्सर्सची दहशत वाढली असून शेतकरी धास्तावले आहेत.