आरंभ मराठी विशेष लेख
पुरुषोत्तम आवारे पाटील,
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राज्य प्रवक्ता
—
आपल्या देशात हजारो वर्षे साप,नाग याबाबत मोठ्या अंधश्रद्धा विकसित झाल्या आहेत,उरलेली कसर पोथ्या,पुराणे,सिनेमा,मालिका आणि धार्मिक कथा,प्रवचन यांनी भरून काढली आहे. आपल्या संस्कृतीत तर नाग खोलवर रुजलेला आहे. नागपंचमी हे त्याचेच प्रतीक आहे.आजच्या नागपंचमीला आपल्या राज्यात घरोघरी प्रत्यक्ष किंवा चित्रातून साप पुजले जातात. साप,नाग,सवारी चक्क लोकांच्या अंगात येत असतात, गावोगावी आजच्या दिवशी नाग किंवा त्या नावावर असलेल्या स्थानिक ग्राम दैवते गावातून फिरवली जातात, नाग जागराचा ठावा केला जातो,याच मिरवणुकीत अनेकांच्या अंगात साप,नाग,सवारी येत असते. मालिका,सिनेमा अन पोथ्यांनी नागाचा महिमा डोक्यात भरलेला असतो,नाग भगवान शंकर यांच्या गळ्यात विराजमान असतो त्यामुळे भाविक पाया पडतात,त्यांच्यापुढे मनोरथ व्यक्त करतात.
चंदन शेष,गुलाल शेष अश्या असंख्य नावाने ग्रामीण भागात नाग महिमा आजही कायम आहे. साप दूध पितो,तो बदला घेतो,चंदनाच्या झाडावर राहतो,धनावर बसतो,जखमी करणाऱ्या व्यक्तीच्या घरात जातो,पुंगीवर डोलतो अश्या असंख्य अंधश्रद्धा आजही सापाबाबत कायम आहेत.
म्हशीच्या पायाला विळखा घालून धामण दूध पिते, किंवा साप दूध पितो, असाही एक गौरसमज आहे. दूध हे सापाचे नैसर्गिक अन्न नाही. दूध हे सस्तन प्राण्याचे अन्न आहे. साप हा सस्तन नाही तर सरपटणारा प्राणी आहे. दुसरा एक गैरसमज म्हणजे म्हाताऱ्या सापाच्या अंगावर केस असतात, तोही चुकीचा आहे. सस्तन प्राण्याच्या अंगावर केस असतात, सरपटणाऱ्या नाही. साप ठराविक दिवसांनी कात टाकतात. त्याची कात व्यवस्थित न निघाल्यास पांढऱ्या केसांसारखी दिसते. साप पुंगीवर डोलतो, हा एक चित्रपटामुळे समाजात पसरलेला गौरसमज. सापाला कान नसल्याने त्याला ऐकू येत नाही. तो हलणाऱ्या वस्तूवर हल्ला करण्याच्या व स्वसंरक्षणाच्या दृष्टीकोनातून लक्ष ठेवून असतो. आपला फणा पुंगीच्या हालचालीप्रमाणे हलवत असतो. आपल्याला मात्र तो पुंगीच्या तालावर डोलत असल्याचा भास होतो.
नागाच्या डोक्यावर मणी असतो आणि ज्याला तो मिळतो तो लखपती बनतो अशी देखील एक बिनबुडाची समजूत आहे. त्याला शास्त्रीय आधार नाही. हे सत्य असते तर गारूडी गरीब राहिलेच नसते. हरणटोळ जातीचा साप म्हणे टाळू फोडतो. हा साप अतिशय नाजूक आहे. त्याचे टोकेरी तोंड रबराप्रमाणे मऊ असते. माणसाच्या कवटीचे हाड अत्यंत कठीण असते. डोक्याची शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांना छन्नी हातोडी वापरावी लागते. या जातीचे साप शक्यतो झाडावर असतात आणि या सापांना चावण्यास माणसाचे डोके जवळ पडते. त्यामुळे हा गैरसमज पसरला आहे. रात्री शीळ घातल्यावर साप घरात येतो, असाही समज आहे, मात्र सापाला कानच नसतात, त्यामुळे तोही खोटा आहे. मांडूळ जातीच्या सापाच्या शरीरात हाडे नसतात, असे म्हटले जाते. प्रत्य़क्षात सर्वच जातीच्या सापांच्या शरीरात दोनशे ते चारशे बरगडया असतात. सापाला केवडा, रातराणीचा वास आवडतो, असे म्हणतात, तेही चुकीचे आहे. केवड्याचे वन काटेरी असून अंधारी असते. केवड्याचे कणीस खाण्यास उंदीर येतात. उंदीर सापाचे भक्ष्य असल्याने साप तेथे येतात. सापाला पापण्या नसतात. त्यामुळे तो डोळे मिटवू शकत नाही. त्यामुळे तो एकटक पाहत असल्याने मोहिनी विद्या वगैरे गैरसमज पसरविले जातात. साप चावल्यास मिरची किंवा कडुनिंबाचा पाला खायला दिल्यास तो गोड लागतो, याला शास्त्रीय कारण आहे. विषारी साप चावल्यावर माणसाच्या संवेदना कमी झालेल्या असतात. त्यामुळे त्याला चव कळत नाही. आपल्या अशा अनेक अंधश्रद्धा आणि मुर्खपणामुळे सापाच्या अनेक जाती नामशेष झाल्या आहेत. नागपंचमीच्या दिवशी फक्त त्याची पूजा करण्याऐवजी सापांना समजावून घेऊ या. मनातील अंधश्रद्धा दूर सारू या.
मो.9892162248