प्रतिनिधी / धाराशिव
श्री काळभैरवनाथ यांच्या जन्माष्टमीनिमित्त परंडा तालुक्यातील कंडारी येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवारी (दि.५) मध्यरात्री बारा वाजता श्री. काळभैरवनाथांचा जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने मंदिराच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सांगता बुधवारी दुपारी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
श्री क्षेत्र कंडारी तसेच सोनारी येथे श्री. काळभैरव नाथांचा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात हरिनामाचा जयघोष सुरू आहे.
कंडारी येथील उत्सवाबाबत माहिती देताना देवस्थानाचे पुजारी रमेश अरुण पुजारी, श्रीराम अरुण पुजारी यांनी सांगितले की,दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ग्रामस्थांच्या वतीने जनमाष्ठमी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहास बुधवारी प्रारंभ झाला असून, येणाऱ्या बुधवारी सांगता होणार आहे. यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, काकडा आरती, भजन आदी कार्यक्रमाचा समावेश आहे. जन्मोत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने पाळणा,त्यानंतर देवाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी व महाआरती करण्यात येणार आहे. रात्री बारा वाजता होणाऱ्या या सोहळ्यात हभप बाळासाहेब महाराज कुटे (बीड) हरी कीर्तन होणार आहे तर बुधवारी हभप धर्मराज महाराज सामनगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. भाविकांनी जन्मोत्सव कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या तसेच पुजारी बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.