शिवसेनेच्या दोन गटात नगर पालिकेच्या कामावरून संघर्ष पेटला
प्रतिनिधी / धाराशिव
कामे मिळविण्यासाठी अंधारात पालकमंत्री महोदयांचे पाय धरायचे आणि उजेडात बगलबच्चांना पुढे करुन आंदोलनाचे नाटक करण्याचा उद्योग उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी बंद करावा. हिम्मत असेल तर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत आणि जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्यावर स्वतः समोर येऊन आरोप करावेत असे थेट आव्हान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिले आहे.
साळुंखे यांनी म्हटले आहे की, नगर परिषदेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनेक अधिकार्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे नगर विकास खात्याच्या आदेशानेच 10 लाखाच्या खालील टेंडर प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे.आता तुमच्या मागणीनुसार पथदिवे आणि स्वच्छतेची टेंडरही बांधकाम विभागाकडे देऊ असा उपरोधिक टोलाही श्री.साळुंके यांनी लगावला आहे.
कामे कोणी रखडवली?
साळुंखे म्हणाले, स्वतःचे पाप झाकण्यासाठी बगलबच्चांना पुढे करुन पालकमंत्री डॉ.सावंत यांच्याविरोधात कितीही टीका केली तरी तुम्हाला जनता चांगलीच ओळखून आहे. अडीच वर्ष सत्ता असताना जनतेच्या पैशाची लूट करुन धाराशिव शहर भकास केले. केवळ विरोध म्हणून अनेक प्रभागातील कामे जाणूनबुजून रखडवून ठेवली. यामागे कोणाचा हात होता, हे आधी सांगावे. आणि मगच पालकमंत्री डॉ.सावंत यांच्यावर आरोप करावेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.उगाच स्वतःचे बगलबच्चे पुढे करून आरोप करू नयेत, अन्यथा आमची शिवसेना जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केले आहे.