कळंब येथील सभेत केले भरभरून कौतुक, म्हणाले..निष्ठावानांना साथ द्या, गद्दाराना गाडून टाका
आरंभ मराठी / कळंब
गद्दारांची टोळी महाराष्ट्रात दरोडा टाकत असताना शिवसेनेच्या धाराशिव जिल्ह्यातील दोन वाघांनी शिवसेनेसोबत निष्ठा दाखवली आणि सेनेचा बाणा दाखवून दिला.अशा वाघांचा आपल्याला अभिमान आहे, असे म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर कौतुक केले.
शिवसेनेच्या संवाद मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर होते. शुक्रवारी दुपारी त्यांची कळंब येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर जोरदार टीका केली तसेच भाजपच्या पक्ष फोडण्याच्या धोरणावर जबरदस्त टोलेबाजी केली. ते म्हणाले, खरी शिवसेना ही आहे. आम्ही बाळासाहेबांचे लढणारे शिवसैनिक आहोत. आमच्या शिवसेनेवर कोणीही दावा करू शकणार नाही. तुम्ही चिन्ह चोरून न्याल,पण प्रत्येकाच्या मनातले प्रेम कसे चोरून नेणार आहात.
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे कौतुक करताना ठाकरे यांनी उभयतांना जवळ बोलावून खांद्यावर हात ठेवून हे दोघे शिवसेनेचे वाघ आहेत,अशा शब्दात जाहीरपणे कौतुक केले. त्यांना कायम साथ द्या, त्यांच्या सोबत रहा, असे आवाहन उपस्थितांना केले.
शुभेच्छा कशा द्याव्यात
महाशिवरात्र अन् महिला दिनाच्या
शुभेच्छा कशा द्याव्यात. मणिपूरमध्ये घडलेले अत्याचार ताजे आहेत. भारतातील पदक विजेत्या महिलांवरील अत्याचारही कसे विसरावेत. अन् त्या अनुषंगाने कोरड्या शुभेच्छा का द्याव्यात हाही मोठा प्रश्न आहे. गद्दार लोकांनी शिवसेना हिसकावण्याचा प्रयत्न केला.मात्र,शिवसेना ही आमची संपत्ती असून, गद्दारांना ती कधीही चोरता येणार नाही, असा जोरदार घणाघात ठाकरे यांनी केला.
ठाकरे म्हणाले, महिलांनो तुम्ही फक्त शुभेच्छा घेऊ नका तर महिषासूरमर्दिनी बनून गद्दारांचा विरोध करा, ही तुम्हाला विनंती आहे. आपले सरकार आणणारच आहोत हे लक्षात घ्या. आमच्या आमदार – खासदाराप्रमाणे संसदेत कोणीही बोलत नाही, याचाही विचार सामान्य नागरिकांनी करावा. उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आम्ही केले. मात्र श्रेय घ्यायला हे पुढे येतात, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
अमित शहा 2019 साली मातोश्रीवर मला भेटायला कशाला आले होते हे त्यांनी जनतेला सांगावे. शिवसेना माझी वडीलोपार्जीत संपत्ती आहे. माझ्या बापाने वाढवलेली ही सेना आहे, याला कोणतेही गद्दार माझ्यापासून हिरावू शकत नाहीत, हेही विरोधकांनी लक्षात घ्यावे.
भाजपने धोका दिल्यामुळे त्यांचा बदला घेण्यासाठीच मी मुख्यमंत्री झालो.
अटल बिहारी वाजपेयी यांनी मोदींना वाचवले, हेही ते विसरले. गोपीनाथ मुंढे, प्रमोद महाजन यांचे अन् आमचे कौटुंबिक संबंध होते.शिवसैनिक तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
शिंदेंसोबत न गेल्यामुळे निधी अडवला
अतिरिक्त सत्र न्यायालय आपल्या सरकारच्या काळात मिळाले.
135 कोटींच्या कामाला मी शिंदेसोबत गेलो नाही म्हणून या सरकारने स्थगिती दिली. आम्ही कधीही ठाकरे यांची साथ सोडणार नाही.
–कैलास पाटील,आमदार
ठाकरे यांचा आदर्श घ्या
दिल्लीपुढे शेपूट घालणाऱ्या लोकांनी अन् त्यांच्या छाताडावर बसून विरोध करणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचा आदर्श घ्यायला हवा.
-खा.ओमराजे निंबाळकर,खासदार
गद्दाराच्या छातीवर नाचावं लागेल
आज महाशिवरात्री आहे, शंकराप्रमाणे गद्दाराच्या छातीवर नाचावे लागेल, हे लक्षात ठेवा. अन् त्यासाठी धाराशिव जिल्हा नक्कीच उत्सुक आहे.
-संजय राऊत,खासदार