आरंभ मराठी / मुंबई
भाजपचे धाराशिव येथील नेते आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मंगळवारी (दि.30) रात्री उशीरा शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. प्रवेशानंतर त्यांनी आपण स्वगृही परतलो,अशी भावना व्यक्त केली. त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र अभिराम पाटील यांच्यासह निवडक पदाधिकारी उपस्थित होते.
सुधीर पाटील यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता.ते शिवसेनेत जिल्हाप्रमुख पदावर होते. जिल्हाप्रमुख पदावर असताना त्यांनी पक्षाला मोठी ताकद दिली होती.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, शेतकरी कर्जमाफीसाठी अचलबेट ते सोनारी पायी दिंडी काढली होती. तसेच तेरणा नदी खोलीकरण आदी सामाजिक कामासोबतच शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन आधार दिला होता. त्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करून पुन्हा एकदा शिवसेनेचे धनुष्य हाती घेतले आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. सुधीर पाटील यांच्यावर पक्षाकडून लवकरच मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. त्यांच्या स्वगृही परतण्याने जिल्ह्यात शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद आणखी वाढणार आहे.
उबाठा गटातील नेत्याचा लवकरच प्रवेश
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. सुधीर पाटील यांच्यानंतर शिवसेना उबाठा गटातील काही नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील आणखी काही नेते पक्षांतराच्या वाटेवर आहेत.त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत.