अमोलसिंह चंदेल / शिराढोण
जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत कळंब तालूक्यातील शिराढोण येथील पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या दरसुची 2023-24 व सार्वजनिक बांधकाम विभाग 2022-23 च्या दरसुचीनुसार दर घेवून आराखडा बनविण्यात आला असून, अंदाजपत्रकानुसार 15 कोटी 22 लक्ष रुपयांच्या निधीस तांत्रीक मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गावाचा पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
शिराढोण येथील पाण्याचा प्रश्न दरवर्षीच मोठया प्रमाणावर भेडसावत होता. येथील सरंपच लक्ष्मीताई म्हेत्रे, ग्रामविकास अधिकारी मोतीराम करपे, माजी सरपंच पद्दमाकर पाटील,
नितीन आबा पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी याबाबत पालकमंत्री प्रा.डाॅ.तानाजी सावंत, आमदार राणा जगजितसिंह पाटील तसेच डाॅ.सरोजिनी संतोष राउत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे शिराढोण गावासाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, त्यास तांत्रीक मान्यता मिळाली आहे. या जलजीवन मिशन अंतर्गत मान्यता मिळालेल्या योजनेतून मांजरा धरणातून शिराढोण पाणीपुरवठयापर्यंत जलवाहिनी, दोन पाण्याच्या
टाक्या, सोलर प्लांट, जलशुध्दीकरण यंत्र, सर्व गावातील पाणीपुरवठा अशी कायमस्वरुपी कामे करण्यात येणार आहेत.
गावाची तहान भागावी व कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी यासाठी गावकऱ्यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. प्रकल्प जवळ असूनही गावाला उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. आता ही समस्या कायमस्वरूपी संपणार आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.