प्रतिनिधी / शिराढोण
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेस 350 वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच हिंदू कल्याणासाठी अहोरात्र झटत असलेल्या विश्व हिंदू परिषद या संघटनेच्या स्थापनेस ६० वर्षे पूर्ण होत असल्याने या दोन्ही प्रसंगाचे औचित्य साधून संपूर्ण देशांमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल संघटनेतर्फे करण्यात येत आहे. यानिमित्ताने धाराशिव ते तीर्थक्षेत्र सोनारी भैरवनाथ मंदिर शौर्य जागरण यात्रेचा प्रवास सुरू आहे. जिल्हा व विभाग कार्यकर्त्यांसह कळंब तालुक्यातील शिराढोण येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता रथाची फेरीची सुरुवात करण्यात आली. यामध्ये गावातील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून शौर्य जागरण रथाचे स्वागत करण्यात आले. नंतर छत्रपती संभाजी चौकात आरती घेऊन संपूर्ण गावांमध्ये फेरी काढण्यात आली. यावेळी शौर्य रथ प्रमुख बबन महाराज, नवनाथ खोड्से, सेवा विभाग प्रमुख मधुकर कुलकर्णी, दत्ता माकोडे, विकास कोंडेकर, नितीन पाटील, सुरेश महाजन, श्याम पाटील, राहुल महाजन, मेघराज मेहत्रे, समाधान ठाकूर, विनोद जाधव, आकाश धाकतोडे, ओम महाजन आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.