अमोलसिंह चंदेल। शिराढोण
अर्ध्या तासाला बस सेवा मिळून प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडूंन 3 वर्षापुर्वी शटल सेवेअंतर्गत लातूर-कळंब व कळंब- लातूर या मार्गासाठी
लातूर व कळंब आगाराच्या बस सुरु करण्यात आल्या होत्या. परंतू कळंब आगाराच्या नियोजन शुन्य कारभारामुळे या बस नियोजीत वेळेनुसार धावत नसल्याने एकाच बसमध्ये बसच्या आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असून, या मार्गावरील प्रवशांची गैरसोय होत असल्याने पैसे देवून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कळंब लातूर मार्गासाठी 3 वर्षापुर्वी कळंब व लातूर आगार मिळून प्रत्येकी पाच-पाच बस शटलसेवे अंतर्गत सुरू करण्यात आल्या होत्या. लातूर आगाराच्या पाचही बस वेळेवर धावतात. परंतु कळंब आगाराच्या सुरु असलेल्या केवळ तीन बसचे मात्र नियोजन शून्य आहे. हा मार्ग विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार वर्ग
यांच्यासाठी महत्वपुर्ण आहे. कळंब ते लातूर मार्गावर तब्बल 50 ते 60 शाळा तर 15 महाविद्यालये आहेत. शटल सेवा म्हणजे अर्ध्या तासाला बस हि सेवा मिळणे गरजेचे आहे. सदरील
दोन्ही आगाराच्या मिळून या बसेस वेळेनुसार धावल्या तर या बसचे उत्पन्नही भरघोस आहे. महामंडळाच्या कर्मचा-यांच्या मनमानी मुळे या बस वेळेवर धावत नसल्याचे प्रवासी बोलतात.
कधी कधी एका पाठोपाठ 3 ते 4 बस येतात, तर कधी कधी नाविलाजाने बस वेळेवर उपलब्ध न झाल्याने बसच्या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच तब्बल शंभराच्या वर प्रवाशी एकाच बसमध्ये उभे राहून प्रवास करतात. या मध्ये वयोवृध्द असणा-या महिला, विद्यार्थी व पुरुषांना मोठा त्रास सहन करावा लागतो . नियोजन नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावाल लागत असल्याने प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रीया सध्या या सेवेबाबत
येत आहेत. या बाबत महामंडळाच्या वरीष्ठा अधिका-यांनी चैकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे.
कळंब आगाराचा गलथान कारभार
कळंब लातूर मार्गावर दोन्ही आगाराच्या पाच-पाच बसेस शटल सेवेसाठी मंजूर आहेत. परंतू कळंब आगाराच्या केवळ तीनच बस सुरु आहेत त्याचेही वेळापत्रकाचे नियोजन मात्र व्यवस्थापनास लागत नसल्याने एका पाठोपाठ एक बस येणे, दोनदोन तास बस उपलब्ध न होणे, अशा विविध अडचणींमुळे
गलथान व नियोजनशुन्य कारभार समोर आला आहे.
कळंब – लातूर मार्गावरील धावना-या बस या वेळे नुसार येत नसल्याने व नियोजनशुन्य कारभाराने प्रवाशांना पैसे देवून सुद्धा उभारून प्रवास करण्याची वेळ येते, तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
वेळापत्रकानुसार बस येत नसल्याने तास न तास बसस्थनकात ताटकळत बसावे लागते. बस उपलब्ध झाल्यास मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशी झाल्याने क्षमतेपेक्षा दुप्पटीने प्रवासी बसमध्ये चढतात परिणामी नाईलाजास्तव पैसे देवून उभ्याने प्रवास करावा लागतो. -ताजखान पठाण ,सामाजिक कार्यकर्ते,शिराढोण.