प्रतिनिधी / धाराशिव
स्त्रीशक्ती कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या जिल्ह्यात रोटरी क्लबने इतिहासात प्रथमच महिलांच्या खांद्यांवर अध्यक्ष आणि सचिवपदाची जबाबदारी सोपवली असून,रविवारी सकाळी शहरातील परिमल मंगल कार्यालयात रोटरीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी अभूतपूर्व उत्साहात नूतन अध्यक्षा डॉ.अनार साळुंके आणि सचिव म्हणून डॉ.मीना जिंतूरकर यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी येणाऱ्या वर्षभरात कोणकोणते उपक्रम राबविणार याबद्दल माहिती दिली, यावेळी त्यांच्या या उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
2023-24 या वर्षासाठी रविवारी सकाळी रोटरीचा पदग्रहण सोहळा परिमल मंगल कार्यालयात पार पडला. या सोहळ्यासाठी डॉ.अशोक बेलखोडे (किनवट) तर रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर डॉ.संजय अस्वले,मावळते अध्यक्ष प्रमोद दंडवते, सचिव डॉ.अनार साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मावळते अध्यक्ष दंडवते यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
नूतन अध्यक्ष डॉ.साळुंके तसेच सचिव डॉ.जिंतूरकर यांनी येणाऱ्या वर्षभरात कोणते उपक्रम राबविणार याची माहिती दिली. त्या म्हणाल्या,वर्षभरात वृक्षारोपण चळवळ अधिक जोमाने पुढे नेणार आहोत तसेच शहरात जल पुनर्भरण कामे करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.शालेय स्तरावर मुलींच्या आरोग्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. आरोग्य हा महत्वाचा भाग असल्याने याविषयीची शिबीरे विद्यार्थी,तरुणांना,व्यवसायिकांना प्रगत करण्यासाठी रोटरी युथ रीडरशिप अवार्ड देणार आहोत. शाळेतील मुलांसाठी आरोग्यासाठी मौलिक सूचना देणार,शाळेला पुस्तके,साहित्य भेट देणार तसेच रोटरीच्या विचाराने अनुषंगाने व्यवसाय चालविणार्यांना पुरस्कार देणार, गरजूंना आर्थिक मदतीचे कार्यही केले जाणार, शहरातील महिलांच्या संघटना, संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत,असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी नूतन अध्यक्ष-सचिवांचा सत्कार केला.कार्यक्रमासाठी शहरातील विविध क्षेत्रातील मंडळींची मोठी उपस्थिती होती.
दोन मुलींना सायकल भेट
सामाजिक उपक्रमाची यावेळी लागलीच सुरुवात करण्यात आली.त्यानुषंगाने भाई उद्धवराव पाटील कन्या शाळा आणि सरस्वती शाळेच्या दोन गरजू मुलींना रोटरीच्या वतीने सायकल भेट देण्यात आल्या.
वृक्षारोपण उपक्रमात कार्य करणारे मारुती कांबळे यांचेही कौतुक करण्यात आले.