
प्रतिनिधी / धाराशिव
कधी कडक उन्हाचे चटके तर कधी पावसाचा जोरदार मारा.. मात्र ते थकले नाहीत, थांबले नाहीत. अविरतपणे प्रवास करतच राहिले आणि त्यांनी अवघ्या आठ दिवसांत धाराशिव ते कन्याकुमारी असा सुमारे 1362 किलोमीटर इतका मोठा पल्ला गाठला. त्यांच्या सायकल मोहिमेने धाराशिवकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. कारण एकाचवेळी इतक्या लांब अंतराची एकत्रित केलेली ही पहिलीच मोहीम असून, शुक्रवारी सायंकाळी त्यांनी कन्याकुमारी kanyakumari गाठली आणि आनंदोत्सव साजरा केला. रोटरी क्लबच्या पुढाकाराने आणि दैनंदिन सरावाने, जिद्दीने, एकजुटीने ही मोहीम पूर्ण करणाऱ्या या तरुणांचा धाराशिवकरांना अभिमान वाटतो आहे.

रोटरी क्लबच्या माध्यमातून परिवारातील सदस्यांनी तसेच एकूण 17 सायकल प्रेमींनी 4 ऑगस्ट रोजी ही मोहीम धाराशिव osmanabad – dharashiv शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू केली होती. यावेळी रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी तरुणांना शुभेच्छा दिल्या आणि वेळोवेळी त्यांच्या व्यवस्थेबद्दल पाठपुरावा केला. प्रचंड कठीण म्हणजे उंच घाट, जंगलाचा रस्ता,त्यात ऊन-पाऊस,हा सगळा प्रवास आव्हानात्मक. तरीही एका जिद्दीने धाराशिव शहरातील 17 जणांनी त्यांची ही मोहीम यशस्वी पद्धतीने पूर्ण केली. रोटरी क्लब आणि सायकल प्रेमी असलेल्या या तरुणांनी 1362 किलोमीटर अंतर अवघ्या 8 दिवसात पार केले. या प्रवासात त्यांचे जागोजागी रोटरी क्लबच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येत होते.तसेच धाराशिव रोटरी क्लबच्या वतीने त्यांच्या व्यवस्थेबद्दल काळजी घेतली जात होती. दररोज दिडशे ते दोनशे किलोमीटर अंतर पार करत सायकल यात्रा तामिळनाडू येथील कन्याकुमारीमध्ये शुक्रवारी सायंकाळी पोहोचली आणि या तरूणांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यांचे शहरवासीयांच्या वतीने कौतुक केले जात आहे. शहरात परत आल्यानंतर रोटरीच्या वतीने या टीमचा सन्मान केला जाणार आहे.
मोहिमेत यांचा सहभाग
या सायकल यात्रा मोहिमेत धाराशिव शहरातील प्रदीप खामकर, रणजित रणदिवे,चित्रसेन राजे निंबाळकर, अमोल माने, सूरज कदम,अजय देसाई, पुरुषोत्तम रुकमे, अभिजित पाटील, इंद्रजीत पाटील, महेश पवार,विशाल थोरात, दिलीप वळसे, दिपक भोसले, रोहन घुटे-पाटील, गणेश एकंडे, दत्ता टेकाळे आणि अमोल निरफळ यांचा समावेश आहे.