कळंब रोटरी क्लबचा 10 वर्षांपासून सामजिक उपक्रम
शाम जाधवर / कळंब
मूकबधीर जीव.. ना ऐकायला येते ना बोलायला, जे सांगायचे ते फक्त इशाऱ्यातून अन् बोलक्या डोळ्यांनीच.पण अशा जीवांच्या चेहऱ्यावर हसू आणि जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम गेल्या 10 वर्षांपासून कळंब रोटरी क्लबच्या माध्यमातून केले जात आहे. निमित्त असते स्वातंत्र्य दिनाचं. मंगळवारी या विद्यार्थ्यांचा सामूहिक वाढदिवस करून त्यांना नवीन कपडे,मिठाई, पाणीपुरी,आवश्यक साहित्याच्या किट वाटप करून वाढदिवसाचा अनोखा सोहळा साजरा करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम राबवते. स्वातंत्र्यदिनानिमित्त तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था संचलित, संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालयात रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी मार्फत हा कार्यक्रम पार पडला.
सुरुवातीला रोटरी अध्यक्ष सुदर्शन नारकर यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
नंतर रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या वतीने मूकबधिर मुलांचा सामूहिक वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी मूकबधिर मुलांना टी-शर्ट व शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप, आवश्यक किट आणि पाणीपुरीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल भडंगे यांनी केले तर सू्त्रसंचालन आश्रुबा कोठावळे यांनी केले. रो.अध्यक्ष सुदर्शन नारकर व रो. सचिव साजेद चाऊस, प्रोजेक्ट चेअरमन किरण चव्हाण, निखिल भडंगे व बालाजी बाहेती, सर्व रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे पदाधिकारी तसेच तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण, मुख्याध्यापक बालाजी जाधवर, सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.