विशेष प्रतिनिधी / मुंबई
विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदार संघाचे आ.रोहित पवार यांनी सकाळी 10 पासून मतदार संघातील एमआयडीसीसाठी उपोषण सुरू केले.
आज विधानसभा कामकाज सुरू झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांनी हा विषय उपस्थित केला. जामखेड मतदार संघातील एमआयडीसीला मंजुरी देण्यात यावी, यासाठी रोहित पवार यांनी भर पावसात आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायऱ्यांवर उपोषण सुरू केले आहे,उद्योगमंत्री सामंत यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी मान्यता देण्यात येईल असे आश्वासन दिले होते,त्यांनतर हे तिसरे अधिवेशन आले आहे,मात्र मान्यता मिळाली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे,सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन उपोषण सोडवावे अशी विनंती देशमुख यांनी केली.
यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्योग मंत्र्यांनी 1 जुलै रोजी लिहिलेले पत्र सभागृहात वाचून दाखवले.या अधिवेशनात त्या बाबत बैठक होऊन निर्णय होईल,त्यामुळे आमदार पवार यांनी पावसात उपोषणाला बसण्याची गरज नव्हती, असा टोला लगावला.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखावे,ती उपोषणाला बसण्याची जागा नव्हे, या शब्दात रोहित पवार यांची खिल्ली उडवली.