उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश यांची अपेक्षा
प्रतिनिधी / कळंब
झाडे लावणे सोपं काम आहे .परंतु त्याचे संवर्धन करणे मोठ्या जिकिरीचे काम आहे, त्यामुळे वृक्ष लागवडीत महिलांचा सहभाग असणे महत्वाचे आहे, प्रत्येक महिलेने झाड लावून आपल्या लेकराप्रमाणे त्याचा सांभाळ करावा, असे आवाहन पोलिस उपाधीक्षक एम. रमेश यांनी एकल महिलांशी बोलताना केले.
वृक्ष संवर्धन समिती च्या पुढाकारातून आणि जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी व सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या प्रेरणेने तसेच पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांच्या साह्याने राबवल्या जाणाऱ्या हरित कळंबसाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन मोहिमेत एकल महिला संघटना आणि पर्याय सामाजिक संस्था सहभाग संकल्प मेळावा सोमवारी (24 जुलै) हसेगाव येथील पर्याय संस्था प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्याय संस्थेचे अध्यक्ष सुभाष तगारे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश, पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, कळंबचे व्यापारी आनंद बलाई, रविकांत आदरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ तोडकर यांनी केले. ते म्हणाले , एकल महिला संघटना आणि बचत गट फेडरेशनच्या अडीचशे महिला लीडर याठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वजणी आणि त्यांचे सोबत असलेल्या 1000 महिला सदस्य वृक्ष लागवड आणि संवर्धन मोहिमेत सहभागी असतील, 28 जुलै रोजी होण्याऱ्या या वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी आपापल्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला ही झाडे लावावी, वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी पर्याय संस्थेने एक लाख रुपये दिल्याबद्दल टाळ्याच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विलास गोडगे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यायचे सुनंदा खराटे, रफिक शेख, भिकाजी जाधव, विकास कुदळे, आश्रुबा गायकवाड, रियाज शेख, वैभव चोंदे, अशोक शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी कळंब आणि वाशी तालुक्यातील तीनशे लीडर महिला उपस्थित होत्या.