समाधान बोराडे / पाथरुड
भूम तालुक्यातील पाथरूड ते जोतिबाचीवाडी रोडलागत लावण्यात आलेले सूचनाफलक काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात खाली पडले आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सहाच महिन्यात सूचना फलक पडल्याचे वृत्त 8 ऑगस्ट रोजी दैनिक आरंभ मराठीने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यालयाने या वृत्ताची दखल घेऊन सदरील फलक तातडीने उभे करण्याचे आदेश संबधित कंत्राटदाराला दिले असून, केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सुमारे 3 कोटी 40 लाख रुपये बजेट मंजूर असलेले या रोडचे काम व्यवस्थित झाले नसल्याच्या तक्रारी आरंभ मराठीकडे आल्या होत्या.त्यानंतर आरंभ मराठीने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन महाराष्ट्र ग्रामीण रस्ता विकास संस्थेचे उपअभियंता (धाराशिव) यांनी बातमीचा दाखला देत कंत्राटदार एस. व्ही. भोईटे यांना निकृष्ट कामाच्या संदर्भात पत्र काढले आहे.
प्रशासनाने काय काढले आदेश ?
या पत्रात म्हटले आहे की, रस्त्यासंदर्भात बसविण्यात आलेले लोगो,बोर्ड, गावच्या नावाचे बोर्ड, गार्ड स्टोन, 200 मीटर स्टोन, किलोमीटर स्टोन सद्यस्थितीत मोडलेले व उखडलेले दिसून आले आहेत. याबाबत आरंभ मराठी या दैनिकामध्ये 8 ऑगस्ट 2024 रोजी बातमी प्रसिद्ध झाली आहे. लवकरात लवकर सर्व पडलेले व उखडलेले रोड फर्निचर तत्काळ बसविण्यात यावेत तसेच केलेल्या कामाचा अहवाल या कार्यालयास विनाविवलंब सादर करण्यात यावा.
बातमीनंतर पाहणी केली, दुरुस्ती होईल
आरंभ मराठीच्या बातमीनंतर दुधोडी रोडची पाहणी केली. त्यामध्ये सूचनाफलक व गार्ड स्टोन पडल्याचे निदर्शनास आले. पाहणीनंतर संबंधित गुत्तेदारास पत्र व्यवहार करून तत्काळ काम दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– लक्ष्मीकांत साळुंखे, अभियंता, पंतप्रधान ग्राम सडक योजना,
दुरुस्तीच्या सूचना दिल्या, समाधान वाटले
दुधोडी जोतिबाचीवाडी या रोडचे काम होण्यासाठी ग्रामस्थांचा अनेक दिवसापासून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. रोडसाठी 3 कोटी 50 लाख रुपये बजेट मिलाले. परंतू सूचना फलक व बोर्ड हलक्या दर्जाच्या कामामुळे सहाच महिन्यात पडले. आरंभ मराठीच्या बातमीनंतर पडलेले बोर्ड व गार्ड स्टोन परत बसवण्याच्या सूचना संबंधित विभागाने दिल्याचे समजले. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
-संदीप महानवर, ग्रामस्थ, दुधोडी