सोयाबीन पिके पाण्यात, काढणीला आलेल्या मुगांचे प्रचंड नुकसान
टीम आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात गेल्या ३६ तासांपासून सर्वदूर जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे अनेक छोट्या छोट्या तलावांचे सांडवे सुटले आहेत. तर सततच्या पावसाने पिकांची नासाडी सुरू झाली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात जिल्ह्यातील १६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे तर आज म्हणजे सोमवारी देखील जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मागील आठवड्यात भरलेल्या तेर येथील तेरणा धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढला असून, त्यामुळे तेरणा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. तेरणा नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपर्यंत आलेली असून नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सुरु झालेला पाऊस रविवारी सायंकाळपर्यंत सुरु होता. रविवारी सुटीचा दिवस असल्याने नागरिक घराबाहेर पडले नाहीत. परंतु या पावसामुळे जनजीवन मात्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.यावर्षी जिल्ह्यात ओला दुष्काळ पडतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.पावसामुळे रविवारचा आठवडी बाजारदेखील विस्कळीत झाला होता. सततच्या पावसाने धाराशिव शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी भुयारी गटार योजनेच्या चेंबरमधून पाणी वाहू लागले आहे. परिणामी दुचाकीस्वारांचे हाल झाले. ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. शनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस गेले ३६ तास सतत सुरू आहे.सततच्या पावसाने विशेषतः सोयाबीन, उडीद,मुगाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या मुगाला जागीच मोड फुटत आहेत.त्यामुळे जिल्ह्यावर यावर्षी ओल्या दुष्काळाची छाया दिसत आहे.
तेरणा’तून 1187 क्यूसेस पाण्याचा विसर्ग
तेर
धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर गेली ३६ तासांपासून पडत असलेल्या सततच्या पावसाने तेरणा नदीला पूर आला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेरणा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग चालू आहे. रविवारी मध्यरात्री पासून तेर व परिसरात दमदार पाऊस चालू आहे. रविवारी तेर पेठ दरम्यान असलेल्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने या भागाचा संपर्क तुटला आहे. धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर सांडव्यावरून पाणी पडत होते. परंतु रविवारच्या पावसाने सांडव्यावरून एक फूट पाणी नदीच्या पात्रात वाहत आहे.पावसाचा जोर वाढतच गेला तर 2021 ची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने यापूर्वीच नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे. धरणातून सध्या 1187 क्यूसेस पाण्याचा विसर्ग तेरणा नदी पात्रात चालू आहे. त्यामुळे नदी काठच्या शेतातील सोयाबीन पाण्याखाली गेले आहे.
लातूरला जाणारा राज्यमार्ग बंद
धाराशिव ते लातूर हा तुगाव,रुई मार्गे जाणारा राज्य मार्ग तेरणा नदीला आलेल्या पाण्यामुळे बंद करण्यात आला आहे. रुई आणि तुगांव या दोन गावांना जोडणारा तेरणा नदीवरील हा पूल सोमवारी सकाळी पाण्याखाली गेला. सध्या या पुलावर तीन फूट पाणी असल्याचे समजते. सध्या सुरू असलेला पाऊस आणि पाण्याचा वाढता प्रवाह पाहता प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे रुई आणि ढोकी या दोन गावांना तडवळा ते येडशी जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.
अतिवृष्टीने पिके पाण्यात
दोन दिवसांच्या सततच्या पावसाने खरीप पिके पाण्यात गेली आहेत. १६ मंडळात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काढणीस आलेल्या मूग या पिकाचे यामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. तसेच सोयाबीन या पिकामध्ये पाणी साठल्यामुळे शेंगा भरण्याच्या अवस्थेतील हे पीक पिवळे पडत आहे. नवीन लागवड केलेला कांदा आणि कांद्याच्या रोपांचे देखील या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तेरणा नदीकाठच्या बऱ्याच शेतात पाणी घुसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी केली आहे.
पोळा सणावर पावसाचे संकट
आज बैलपोळा असल्यामुळे शेतकऱ्यांनी चार दिवसांपासूनच त्याची तयारी सुरू केली होती. परंतु शनिवारी रात्रीच सुरू झालेल्या पावसामुळे पोळा सणाचा उत्साह थोडा कमी झाल्याचे दिसून आले. काल खांदे मळणी साठी देखील पावसाने उघाड न दिल्यामुळे पडत्या पावसातच खांदेमळणी करावी लागली. आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने तसेच नदी, ओढ्यांना पाणीच पाणी आल्यामुळे गावात आणून बैलांचे पूजन करताना बळीराजाला अडचणी येऊ शकतात. एरव्ही बैल पोळ्याला असणारा उत्साह आज पावसामुळे कमी झाल्याचे दिसत आहे.
या मंडळामध्ये झाली अतिवृष्टी- (पाऊस मिमी मध्ये)
१) धाराशिव शहर – 68 मिमी
२) धाराशिव ग्रामीण – 104 मिमी
३) ढोकी – 65 मिमी
४) जागजी – 80 मिमी
५) तेर – 68 मिमी
६) कळंब – 74 मिमी
७) इटकूर – 80 मिमी
८) येरमाळा – 83 मिमी
९) मोहा – 73 मिमी
१०) शिराढोण – 67 मिमी
११) गोविंदपूर – 65 मिमी
१२) डाळिंब – 94 मिमी
१३) माकणी – 88 मिमी
१४) वाशी – 69 मिमी
१५) पारगाव – 73 मिमी
१६) तेरखेडा – 80 मिमी