प्रवेशद्वारावर लेणी आणि किल्ल्यांच्या लक्षवेधी शिल्पाकृती,आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / धाराशिव
केंद्र सरकारच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत धारशिवाच्या रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाठी 21 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून रेल्वेस्थानकाचा पायाभूत विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. रविवारी, 6 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता धाराशिव रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील एक हजार 309 स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. सोलापूर विभागाअंतर्गत एकूण 15 रेल्वेस्थानकांचा यात समावेश करण्यात आला असून, धाराशिव रेल्वेस्थानकाचे त्यामुळे रूपडे पालटणार आहे. रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रमात रेल्वेस्थानकाच्या विकासकामाचे उद्घाटन केले जाणार आहे. या योजनेमुळे रेल्वे स्थानकाचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून रेल्वेस्थानकांचा पायाभूत विकास करण्यावर या योजनेवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी दीर्घकालीन विकास आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. स्थानकांचा विकास करताना दररोज स्थानकावर येणारी सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेवून नियोजन करण्यात आले आहे. एकंदरीत प्रवासी केंद्रीत सुविधा स्थानकांवर विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानकाच्या बाह्यरूपासोबतच अंतर्गत भागातही सुधारणा करण्याची तरतूद या योजनेत असणार आहे.नको असलेली बांधकामे हटवून पदपथ विकसित करणे, रस्त्यांचे रूंदीकरण, वाहनतळाची आधुनिक व्यवस्था, त्याचबरोबर ग्रीनपॅचद्वारे प्रवाशांना सुखद अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्व नागरिकांना रेल्वेस्थानकाच्या प्रतिक्षागृहात बसता येईल, अशी व्यवस्था देखील या योजनेंतर्गत केली जाणार आहे. महिला आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय महिला, दिव्यांग आणि नागरिकांसाठी ठिकठिकाणी अत्याधुनिक सुविधांचा वापर करून स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी, 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वा ऑनलाईन पध्दतीने कामाचे उद्घाटन केले जाणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमासाठी धाराशिव रेल्वेस्थानकावर उपस्थित रहावे, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
दर्शनी भागात किल्ला व लेण्यांच्या शिल्पाकृती
धाराशिव रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासासाठी 21 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या माध्यमातून रेल्वेस्थानकाच्या अंतर्गत आणि बाह्य सुधारणांना प्राधान्य दिले जाणार आहे. रेल्वेस्थानकाच्या दर्शनी भागात किल्ल्यांच्या भव्य प्रतिकृती आणि लेणींची लक्षवेधी शिल्प साकारली जाणार आहेत. त्यासाठी 21 कोटी रूपयांचा निधी धाराशिव रेल्वेस्थानकासाठी मंजूर झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार, 6 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पध्दतीने या कामाचे उद्घाटन केले जाणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
अशी असतील स्थानकाची वैशिष्ट्ये
■ स्थानकावर रेल्वेच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना शांतपणे थांबता येईल, अशी व्यवस्था या योजनेअंतर्गत उभारली जाणार आहे.
■फाईव्ह-जी कनेक्टिव्हीटीसह वायफायच्या मोफत उपलब्धतेमुळे प्रवाशांचे मनोरंजन होणार आहे. चित्रपट, मालिका आणि विविध विषयांची पुस्तके सहज डाऊनलोड करणे शक्य होणार आहे.
■उंचावलेल्या प्लॅटफॉर्ममुळे रेल्वे रूळावर होणार्या अपघातांची संख्या कमी होणार आहे.
■स्थानकाची सुलभता सुधारल्यास गाड्यांमधील खानपान व्यवस्थेवर विशेष भर दिला जाणार आहे.
■छोट्या व्यावसायिक बैठकांसाठी जागा देखील तयार केल्या जाणार आहेत.