युवा सेनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण देशमुख यांनी केला होता पाठपुरावा
प्रतिनिधी / भूम
तालुक्यातील ईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मान्यता दिली असून,यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे बाजार समिती संचालक तथा युवा सेनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण देशमुख यांनी पाठपुरावा केला होता.
ईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणार असल्याने ईट सह परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे. या परिसरातील रुग्णांना उपचार करण्यासाठी बार्शी, बीड, सोलापूर, जामखेड या ठिकाणी जावे लागत असल्याने गैरसोय होत होती. रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. आता ग्रामीण रुग्णालय होणार असल्याने नागरिकांतून आनंद व्यक्त होत आहे. ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याचे समजताच ईट येथे फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.या निर्णयामुळे नागरिकांतून राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.