अग्रीम न मिळालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायकांशी संपर्क साधावा – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन
प्रतिनिधी / धाराशिव
खरीप २०२३ मधील सोयाबीन पिकाचा अग्रीम विमा न मिळालेल्या उर्वरित 28953 शेतकऱ्यांना 19 डिसेंबरअखेर रक्कम देण्यात येणार असून, 7 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र असलेल्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात आली आहे.दरम्यान जिल्ह्यातील ९४% शेतकऱ्यांना आजवर पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळाली असून, अग्रिम विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायक यांना संपर्क साधुन त्रुटी दूर कराव्यात, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील खरीप २०२३ मध्ये पिक विमा हप्ता भरलेल्या ५,६०,३५२ शेतकऱ्यांपैकी ५,३१,३९९ शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी अग्रिम पिक विमा वितरित झाला आहे. उर्वरित २८,९५३ शेतकऱ्यांना १९ डिसेंबर पर्यंत रक्कम अदा करण्याचा प्रयत्न असून, विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायकाशी संपर्क साधून तांत्रिक बाबींची पूर्तता करावी, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
४,०६३ शेतकऱ्यांचे सी.एस.सी. केंद्राकडे फेर तपासणीसाठी प्रस्ताव परत पाठविले आहेत, अशा शेतकऱ्यांनी फेर तपासणी करून घ्यावी. ७ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या १६,८७० शेतकऱ्यांची क्षेत्र पडताळणी पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना १९ डिसेंबरच्या आत रक्कम अदा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला दिल्या आहेत. या व्यतिरिक्त रु. १,००० पेक्षा कमी रक्कम असलेल्या ७,२२२ शेतकऱ्यांना शासनाकडून अधिकचे अनुदान आल्यानंतर रु. १,००० प्रमाणे रक्कम अदा केली जाणार आहे. ७९८ अर्ज अपात्र करण्यात आले आहेत, कोणत्या कारणांमुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे, त्याची कृषी सहायकांना भेटून खातरजमा करावी. ही सर्व माहिती शेतकऱ्यांच्या नावासह कृषि सहायक यांच्याकडे उपलब्ध करण्याच्या व शेतकऱ्यांना या विषयात मदत करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना दिल्या असून त्रुटी पूर्ततेसाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे सूचित करण्यात आले आहे.