महायुतीकडून जोरदार तयारी, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
आरंभ मराठी /धाराशिव
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आता प्रचंड जोर येऊ लागला आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धाराशिव शहरात प्रचार सभा घेणार आहेत. मंगळवार, 30 एप्रिल रोजी त्यांची प्रचार सभा होणार असून, या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर विरुद्ध महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये थेट लढत आहे. दोन्ही बाजूंनी आता प्रचाराला जोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी शिवसेनेच्या तसेच काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सायंकाळी 6 वाजता तुळजापूर शहरात सभा आहे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही सभा होण्याची शक्यता आहे.
इकडे महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही लवकरच सभा होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन सुरू झाले आहे. मंगळवारी धाराशिव शहरातील तुळजापूर रोडवरील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात पंतप्रधान मोदी यांची सभा होण्याची शक्यता आहे .त्या दृष्टीने महायुतीकडून जागेचे नियोजन सुरू झाले आहे.
शरद पवार तुळजापूर मुक्कामी
महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सायंकाळी तुळजापूर मध्ये प्रचार सभा घेणार आहेत. त्यानंतर त्यांचा तुळजापूर शहरातच मुक्कामही असणार आहे. या काळात ते तुळजापूर आणि परिसरातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतील.