आरंभ मराठी / धाराशिव
मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती अचानक खालावली आहे. ते आज येरमाळा येथे आले होते. त्यांचा पुढील येडशी, कळंब, धाराशिव, बीड भागातील दौरा रद्द करण्यात आला असून, प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते छत्रपती संभाजी नगरकडे रवाना झाले. त्यांना संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वेगवेगळ्या भागात त्यांनी मराठा समाजाच्या बैठका घेत जनजागृती सुरू ठेवली आहे. ते बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा भागात दौऱ्यावर होते. कुलस्वामिनी येडेश्वरी मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मराठा समाज बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर पुढील दौऱ्यावर जात असताना त्यांना अचानक त्रास सुरू झाला. प्रकृती खालावत असल्याने त्यांचे पुढील दौरे रद्द करण्यात आले असून, त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान त्यांच्या प्रकृतीची सर्वांना काळजी असून, राहिलेले दौरे काही दिवसात पूर्ण करू, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 50% च्या आत ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या आठ महिन्यांपासून लढा देत आहेत. तीन वेळा खडतर उपोषण करूनही सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा व्यापक स्वरूपात आंदोलन उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आहेत. याचा भाग म्हणूनच ते आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने पुढील दौरा रद्द करावा लागला आणि त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.