प्रतिनिधी / मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सिंधुदुर्ग येथील नौदल दिनाच्या मुख्य कार्यक्रमात धाराशिवच्या नावाचा उल्लेख केला. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची थरारक प्रात्यक्षिके यांचे त्यांनी निरीक्षण केले. यावेळी भाषणात मोदी यांनी राज्याच्या विकासाबाबत समाधान व्यक्त करताना धाराशिव तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा उल्लेख केला.
आपल्या वारशाचा अभिमान बाळगत पंतप्रधानांनी घोषणा केली की भारतीय नौदल आता भारतीय परंपरेनुसार आपल्या पदांचे (रँक) नामकरण करणार आहे. सशस्त्र दलांमध्ये नारी शक्ती मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला. नौदलाच्या जहाजात भारताच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरच्या नियुक्तीबद्दल मोदी यांनी भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.
इतिहासातून प्रेरणा
140 कोटी भारतीयांचा विश्वास ही सर्वात मोठी शक्ती आहे, कारण भारत मोठी उद्दिष्टे निश्चित करत आहे आणि पूर्ण दृढनिश्चयाने ती साध्य करण्यासाठी झटत आहे,असे पंतप्रधान म्हणाले. विविध राज्यांतील लोक ‘ राष्ट्र प्रथम’ या भावनेने प्रेरित होत असल्यामुळे संकल्प, भावना आणि आकांक्षा यांच्या एकत्रित सकारात्मक परिणामांची झलक दिसून येत आहे असे पंतप्रधान म्हणाले. “आज देशाने इतिहासातून प्रेरणा घेतली आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार केला जात आहे. नकारात्मकतेच्या राजकारणावर मात करून प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा संकल्प जनतेने केला आहे. हा संकल्प आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जाईल” असे ते म्हणाले.
गमावलेले वैभव परत मिळवायला हवे
भारताच्या व्यापक इतिहासाबाबत व्यक्त होताना पंतप्रधान म्हणाले की, हा इतिहास केवळ गुलामगिरी, पराभव आणि निराशेबद्दलचा नसून, त्यामध्ये भारताचे विजय, धैर्य, ज्ञान आणि विज्ञान, कला आणि सृजनशीलता, कौशल्ये आणि भारताच्या सागरी क्षमतांच्या गौरवशाली अध्यायांचाही समावेश आहे. तंत्रज्ञान आणि साधन सामुग्रीची उपलब्धता जवळजवळ नाहीच, अशा काळात उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्गसारख्या किल्ल्याचे उदाहरण देऊन त्यांनी भारताच्या या क्षमतांवर प्रकाश टाकला. त्यांनी गुजरातमधील लोथल येथे सापडलेले सिंधू संस्कृतीमधील बंदर, आणि सुरत येथील 80 पेक्षा जास्त जहाजे नांगरण्याची क्षमता असलेल्या बंदराच्या वारशाचा उल्लेख केला. चोल साम्राज्याने आग्नेय आशियाई देशांपर्यंत आपला व्यापार वाढवला होता, त्याचे श्रेय पंतप्रधानांनी भारताच्या सागरी सामर्थ्याला दिले. परकीय शक्तींच्या आक्रमणामुळे सर्वात प्रथम भारताची सागरी क्षमता बाधित झाल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, जो भारत नौका आणि जहाजे बनवण्यासाठी प्रसिद्ध होता, त्याने समुद्रावरील आपले नियंत्रण गमावले आणि त्यामुळे सामरिक-आर्थिक ताकदही गमावली. भारत विकासाकडे वाटचाल करत असताना, आपण आपले गमावलेले वैभव परत मिळवायला हवे, यावर भर देत पंतप्रधानांनी ब्लू इकॉनॉमी, अर्थात नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी ‘सागरमाला’ प्रकल्पाअंतर्गत बंदराच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाचा उल्लेख केला आणि सांगितले की भारत ‘मेरिटाइम व्हिजन’, अर्थात सागरी दृष्टीकोना अंतर्गत आपल्या महासागरांच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी माहिती दिली की सरकारने व्यापारी मालवाहतुकीला चालना देण्यासाठी नवीन नियम बनवले आहेत. त्यामुळे गेल्या 9 वर्षांमध्ये भारतातील सागरी व्यापाऱ्यांची संख्या 140 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
धाराशिवबद्दल काय म्हणाले मोदी
राज्याच्या विकासासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग, परभणी आणि धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन, चिपी विमानतळाचे कार्यान्वयन आणि माणगावपर्यंत जोडणाऱ्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा उल्लेख केला.काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना तयार केल्याचेही नमूद केले. समुद्रकिनारी असलेल्या निवासी भागांचे रक्षण करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रयत्नात त्यांनी खारफुटीची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जात असल्याचा उल्लेख केला.