प्रतिनिधी / वाशी
तालुक्यातील पारा येथे वाशी पोलिस स्टेशन व पारा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.३) रोजी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. यावेळी पारा गावातून ग्रामसुरक्षा दलाचे पथसंचालन करण्यात आले.
पोलिस स्टेशनचे कमी मनुष्यबळ आणि पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अतिरिक्त गावे यामुळे दुरक्षेत्रातील गावात कायदा सुव्यवस्था राखण्यात किंवा एखादी घटना घडल्यावर घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागतो.दुरक्षेत्रात काम करत असताना पोलिसाना मर्यादा येतात. यामुळे पारा दुरक्षेत्रात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. यावेळी ग्रामसुरक्षा दलातील स्वयंसेवकांना लाठी, ग्रामसुरक्षा दल पारा नाव असलेली जर्सी यासह इतर साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी पारा गावातून पोलिस व ग्रामसुरक्षा दलाचे पथसंचालन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक शशी दसुरकर, सरपंच राजेंद्र काशीद, बिट अंमलदार मोहसीनखान पठाण, पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ सुरवसे, महादेव लोकरे, एम बी कुरुंद, सचिन कवडे, महेश खोले यांच्यासह आम्ही पारेकर प्रतिष्ठान चे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.