प्रतिनिधी / तेरखेडा
वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आदिवासी लोकांचा भव्य मेळावा पार पडला.यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना सरकारी योजनांच्या मंजुरीचे पत्र देण्यात आले तर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
महाराष्ट्र राज्याची भौगोलिक क्षेत्र पाहता आदिवासी लोकांना क्षेत्र 16.5 % एवढे होते. गेल्या 3 दशकात राज्याची लोक संख्या जशी वाढत गेली तशी आदिवासी लोकसंख्या तुलनात्मक वाढत गेली. परंतु त्याप्रमाणात त्यांना सोयीसुविधा मिळत नव्हत्या. या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून जागतिक आदिवासी निमित्ताने तेरखेडा येथील व परिसरातील आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व शासकीय सुविधा मिळण्यासाठी मदत व्हावी म्हणून जिल्हा विधी सेवा व जिल्हा पोलीस प्रशासन व तालुका विधी सेवा समितीमार्फत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्ष लागवड करून करण्यात आली. त्यानंतर तेरखेडा येथील सुहासिनी मंगल कार्यालयात मेळावा घेण्यात आला. यादरम्यान ७४ लोकांना प्रत्यक्ष योजनेचे मंजुरी आदेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.यात रेशन कार्ड, घरकुल मंजुरीसह अन्य शासकीय योजनांचा समावेश होता. प्रशासनाकडून अनेक चांगल्या योजना आदिवासी बांधवांसाठी लागू करण्यात आल्या आहेत, त्याचा लाभ घेऊन आपण अवैध व्यवसाय बंद करावेत. यासाठी प्रसंगी पोलीस प्रशासन तुम्हाला मदत करेल,असे आश्वासन यावेळी प्रशासनाकडून देण्यात आले.
आदिवासी लोकांसाठी पहिले आरोग्य तपासणी शिबीर जिल्ह्यातील आदिवासी लोकांसाठीचे हे पहिलेच आरोग्य शिबीर ठरले.यात आजारी लोकांची तपासणी करण्यात आली. त्यांना गरजेनुसार औषधे देण्यात आली. यामध्ये जिल्हा आयुर्वेदिक डॉक्टरची टीम तसेच तेरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम सहभागी झाली होती.आदिवासी समाजातील।काही लोक शेतमजूर म्हणून तसेच फटाक्याच्या कारखान्यात काम करतात. त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधे देण्यात आली तसेच डॉ. निखिल रणदिवे यांनी महासुदर्शन काढा विषयी रुग्णांना माहिती दिली.औषध वाटप करण्यात आले.पारधी पिढीवर चालणारे अवैध धंदे बंद करून वेगळ्या व्यवसायासाठी त्यांचे स्किल डेव्हलपमेंट शिबिराचे भविष्यात आयोजन करण्यात येणार आहे तसेच त्यांना लघुउद्योग प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश अंजु शेंडे,जिल्हा न्यायाधीश एस.आर.उगले,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, नवनीत कॉवत, तहसीलदार नरसिंह जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जे. एस.गायकवाड,येरमाळाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील, वसंत यादव आदींनी पुढाकार घेतला.