पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या भूमिकेकडे मतदारसंघाचे लक्ष
आरंभ मराठी / धाराशिव
लोकसभेची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर काही वेळातच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून,भव्य शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील या शुक्रवार, 19 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उस्मानाबाद लोकसभेचा आखाडा आता चांगलाच रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जोरदार तयारी केली असून, सोमवारी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म स्वीकारला. त्यांनी तुळजापुर येथे जाऊन कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते धाराशिवकडे रवाना झाले असून, काही वेळातच ते प्रदर्शन करून निवडणूक अधिकाऱ्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,आमदार रोहित पवार, आमदार अमित देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
दोन्ही उपमुख्यमंत्री शुक्रवारी शहरात..?
महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारीचा अर्ज शुक्रवारी दाखल केला जाणार आहे महायुतीच्या वतीने शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार असून, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार उपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही प्रमुख पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात असल्याने निवडणूक प्रचाराला आता जोर येणार आहे.
पालकमंत्र्यांची भूमिका गुलदस्त्यात
आपले पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी अद्याप लोकसभा निवडणूक संदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा ते प्रचार करणार की नाही, उमेदवारी अर्ज भरताना पालकमंत्री डॉ. सावंत उपस्थित राहणार का अनुपस्थित, याकडे लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरेंसह मोदी, अमित शहा, शरद पवारांची सभा
उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दीर – भावजयमध्ये होणारा सामना, एकाच कुटुंबातील पारंपारिक लढाई,राज्य आणि जिल्हा स्तरावर पक्ष बदलाचे झालेले निर्णय, यामुळे यावेळची निवडणूक लक्षवेधी होणार आहे. महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि अन्य प्रमुख नेते येण्याची शक्यता आहे तर महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औसा येथे सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांच्या सभा होणार असल्याची चर्चा आहे.