मालमत्ताही विक्रीला; दूध संघ राहिला फक्त कागदावर
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव –
चार दशकांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात सहकाराच्या माध्यमातून गावखेड्यातील शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळवून देणारा जिल्हा दूध संघ आता केवळ कागदावर उरला आहे. धाराशिव जिल्हा दूध संघ दुसऱ्यांदा अवसायनात काढून जिल्ह्यातील सहकाराची उरलीसुरली आशा देखील संपली आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी लुटून खाल्लेला जिल्हा दूध संघ इतिहासजमा झाला असून दूध संघाची स्थावर आणि जंगम मालमत्ता देखील आता राहिली नसल्यामुळे जिल्ह्यातील सहकार मोडीत निघाला आहे.
शेतीसोबतच जोडधंदा करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने ऐंशीच्या दशकात दूध महापूर योजना सुरू केली होती. सहकारी संस्थांच्या तो सुवर्णकाळ होता. सहकाराच्या माध्यमातून दुधाचा व्यवसाय करून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा आणखी एक स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा दूध संघ स्थापन करण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यात देखील असाच जिल्हा दूध संघ १९८२ साली स्थापन करण्यात आला होता. त्यावेळी लातूर देखील धाराशिव जिल्ह्याचा भाग होते. २२ ऑगस्ट १९८२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव पाटील आणि दुग्धविकास मंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्हा दूध संघाचे उद्घाटन केले होते. पुढे दोनच वर्षात लातूर जिल्हा वेगळा झाल्यानंतर फक्त धाराशिव जिल्ह्यासाठी दूध संघ सुरू राहीला. १९८२ ते २००२ या वीस वर्षांच्या काळात जिल्हा दूध संघाने सुवर्णकाळ पाहिला. या काळात प्रत्येक दिवशी एक लाख लिटर दुधाचे संकलन होत होते. दूध संघाचा व्यवहार इतका चोख होता की, या काळात प्रत्येक दहाव्या दिवशी शेतकऱ्यांना दुधाचे पैसे मिळत होते. दूध संघाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरा सहकार अनुभवला.
गावागावात दूध संघ तयार झाले. प्रत्येक गावातून हजार, दीड हजार, दोन हजारे लिटर दुधाचे संकलन व्हायचे. जिल्ह्याचे एकूण संकलन एक लाख लिटरपेक्षा अधिक व्हायचे. परंतु, परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. दूध संघातील काही लोकांच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढायला लागल्या. आणि त्यातूनच जिल्हा दूध संघात राजकारण घुसले. एक असणाऱ्या दूध संघाची पुढे चार शकले पडली.
धाराशिव मध्ये दोन आणि भूम व वाशी येथे प्रत्येकी एक एक असे एकाचे चार वेगवेगळे दूध संघ झाल्यामुळे दूध संकलन विभागले गेले. त्यामुळे जिल्हा दूध संघाचे अर्थकारण हळूहळू बिघडायला लागले. मासिक मीटिंगमध्ये राजकीय नेत्यांची हमरीतुमरी आणि राजकीय कुरघोड्यांची नुरा कुस्ती होऊ लागली. परिणामी शेतकऱ्यांना दहा दिवसांचा पगार वेळेत मिळेना झाला. दूध संघाचे संपूर्ण अर्थचक्र बिघडल्याने शेतकऱ्यांचा दूध संघावरील विश्वास उडू लागला. यातच दूध संघावरील देणी वाढत जाऊ लागली.
संचालक पदावरील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दूध संघाला उभारी देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. त्यातच खाजगी दूध संघांनी हातपाय पसरायला सुरुवात केल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी जिल्हा दूध संघाला दूध देण्यास तयार होईनात. जिल्हा दूध संघाशी तब्बल ८९२ संस्था संलग्न होत्या.
२०१५ साल येइपर्यंत यातील फक्त २६ संस्था सुरू होत्या. २००७ ते २०१२ हा पंचवार्षिक कालावधी संपला तरी निवडणुका न घेणे, लेखापरीक्षण वेळेत न करणे या आणि इतर कारणासाठी अखेर फेब्रुवारी २०१५ मध्ये धाराशिव जिल्हा दूध संघ अवसायनात काढण्यात आला. त्यावेळी दूध संघाकडे तब्बल ३ कोटी रुपयांची देणी थकीत होती.
७८ कर्मचाऱ्यांची सेवा खंडित –
२०१५ मध्ये जिल्हा दूध संघाचे ७९ कर्मचारी होते. उत्पन्नाचे कुठलेच साधन नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांची पगार वेळेत होत नव्हती. त्यातच पीएफ आणि इतर आर्थिक बाबी बराच काळ थकीत राहिल्या. परिणामी, जुलै २०१५ मध्ये ७९ पैकी ७८ कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली. आता सध्या एकच कर्मचारी जिल्हा दूध संघाचे काम करतात.
अवसायनाच्या निर्णयावर स्थगिती –
अवसायनाच्या निर्णयावर स्थगिती आणण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले आणि अवसायनाच्या निर्णयावर स्थगिती आली. जुन्या संचालक मंडळालाच पुन्हा सहा महिन्यासाठी संधी दिली आणि सहा महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. २०२३ ला १३ जणांचे नवीन संचालक मंडळ निवडून आले. यामध्ये ८ तालुक्यातील प्रतिनिधी, २ महिला आणि २इतर जाती जमातीचे प्रतिनिधी संचालक म्हणून नेमले.
पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न परंतु, यश नाही –
२०२३ नंतर जिल्हा दूध संघाला पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले गेले. परंडा येथून दररोज सात हजार लिटर दूध संकलन करून वर्षभर जिल्हा दूध संघ सुरू ठेवला. परंतु, शेतकऱ्यांना आणि वाहतूक ठेकेदारांना वेळेत पगार न मिळणे, इतर तालुक्यातून दूध संकलन नसणे यामुळे वर्षभरानंतर पुन्हा दूध संकलन करणे बंद झाले. जून २०२४ नंतर दूध पूर्ण बंद झाले.
दूध संघ दुसऱ्यांदा अवसायनात काढला –
३० जानेवारी २०२५ रोजी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांनी दूध संघ अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला. सध्या अवसायक म्हणून एम. बी. बनसोडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था यांची नेमणूक करण्यात आली आहे.
स्थावर आणि जंगम मालमत्तेची विक्री –
मागील सात वर्षात दूध संघावर चार अवसायक आले. त्यांनी दूध संघाची सर्व थकीत देणी देण्याकरिता दूध संघाची स्थावर आणि जंगम मालमत्ता विक्रीस काढली. यामध्ये दूध संघाची एक एकर जागा साडेतीन कोटी रुपयांना विकण्यात आली. यामधून सर्व देणी देण्यात आली नाहीत. अजूनही जवळपास एक कोटीची देणी बाकी आहेत. तर दूध संघाला ७० ते ८० लाख रुपये येणे आहे.
सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची अनास्था –
जिल्हा दूध संघ संपण्यास सर्वपक्षीय राजकीय नेते कारणीभूत आहेत. दूध संघाचा सुवर्णकाळ असताना सर्वपक्षीय नेत्यांनी फक्त आपापले राजकीय स्वार्थ साधले. परंतु, कोल्हापूरच्या गोकुळ प्रमाणे आपल्या दूध संघाला मोठं करण्यासाठी एकाही नेत्याने प्रयत्न केले नाही. दूध संघाच्या अपयशाचे खापर सर्वपक्षीय नेते आजही एकमेकांवर फोडतात. आज हा हा दूध संघ एका कर्मचाऱ्यासह केवळ कागदावर उरला आहे.