प्रतिनिधी / धाराशिव
झगमगीत, आकर्षक, संगीत कारंजे, बोटींतून फिरण्याचा मनस्वी आनंद आणि हिरव्यागार निसर्गाचं सान्निध्य, हातलाई तलाव आणि सभोवताली पर्यटनाच्या दृष्टीने विकासाचं अजून एक स्वप्न धाराशिवकरांनी पाहिलेलं. हे स्वप्न 5-6 वर्षांपूर्वी दाखविण्यात आले, पण त्याची पूर्तता अजून झालेली नव्हती. धारशिवकारांचे हे स्वप्नही आता चोरीला गेलं आहे. अर्थात हातलाई तलावात बसविण्यात आलेले तरंगते कारंजे, संगीत सिस्टीम आणि मोटारी आदी सुमारे 9 लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेले असून, यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकासाची आस असलेल्या धाराशिव जिल्ह्याला लोकप्रतिनिधींकडून, अधिकाऱ्याकडून नेहमीच नवनवीन विकासाची स्वप्नं दाखवली जातात.पुढे त्या स्वप्नांची पूर्तता होईलच असे नाही.धाराशिव शहरात एकही उद्यान नाही, पर्यटनाच्या दृष्टीने कोणतीही सोय नाही. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना विरंगुळा करता येईल असं एकही ठिकाण नाही. हातलाई तलावात संगीत कारंजे आणि परिसरात फिरण्यासाठी पदपथ तयार करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने 5-6 वर्षांपूर्वी घेतला होता. त्यासाठी पाऊण कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी बहुतांश निधी खर्च करण्यात आला. मात्र नागरिकांना काही कारंजे पहायला मिळाले नाहीत.मात्र धाराशिवकरांनी पाहण्यापूर्वीच हे कारंजे चोरीला गेले असून, आता पर्यटन विकासाचे हे स्वप्न अधुरेच राहणार की पूर्ण होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मार्च महिन्यात चोरी, सप्टेंबर महिन्यात तक्रार
हातलाई तलावातील कारंजे आणि अन्य साहित्य 23 मार्च ते 23 मे या कालावधीत चोरीला गेले आहे. तलावातील तरंगते कारंज्याचे साहित्य, नोझल्स, मोटारी, फोल्ड ड्रम केबल पंपाचे स्टार्टर, एम.इ.ए. बी.डीपी, एमसीबी ट्रान्स म्युजिकल सिस्टीम व इतर सुमारे 9 लाख रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले आहे.यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उप विभागाचे अभियंता श्रीकृष्ण पांडुरंग शिंदे यांनी 9 सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मार्च महिन्यात चोरी होऊन गुन्हा दाखल करण्यासाठी इतका कालावधी कसा लागला हाही संशोधनाचा विषय आहे.