अशोक चव्हाण यांची मागणी,उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेऊ
विशेष प्रतिनिधी / मुंबई
ज्येष्ठ दिग्दर्शक नितिन देसाई यांच्या आत्महत्येबद्दल गुरुवारी विधानसभेत चर्चा झाली. नितीन देसाई यांच्या मागे कर्जवसुलीसाठी काही लोक लागले होते त्यामुळे त्यांना हा मार्ग अवलंबावा लागला त्यामुळे एन.डी.स्टुडिओ कुठल्याही खाजगी लोकांच्या ताब्यात न जाता शासनाने टेक ओव्हर करावा,अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. तत्पूर्वी आशिष शेलार यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी,अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कायदेशीर बाबी तपासून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल.देसाई यांची आठवण म्हणून हा स्टुडिओ जतन करण्याचा निश्चित प्रयत्न करू.
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एन डी स्टुडिओत काल सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने कला तसेच विविध क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातही शोक व्यक्त करण्यात येत आहे. आज विधानसभेत या विषयावर चर्चा झाली. आशिष शेलार यांनी या प्रकरणात सरकारकडे सखोल चौकशीची मागणी केली.ते म्हणाले, एका सुप्रसिद्ध दिगदर्शकाला या पद्धतीने आपला जीव गमवावा लागला हे क्लेशदायक आहे. या मुळाशी जाण्याची गरज आहे. तर अशोक चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास करून त्यांना न्याय मिळवून द्यावा,अशी भूमिका मांडली. ते म्हणाले, काही लोक कर्जवसुलीसाठी त्यांच्या मागे लागले होते.देसाई यांनी काही पुरावे दिले आहेत, त्याची माहिती वृत्तपत्रातून आणि टीव्हीवर मिळाली. त्यामुळे शासनाने हा स्टुडिओ खासगी लोकांच्या ताब्यात न जाऊ देता टेक ओव्हर करावा. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले, देसाई यांच्या सारखा ज्येष्ठ दिग्दर्शक जाणं आपल्या सगळ्यांसाठी अतिशय दुःखद बाब आहे. या प्रकरणी कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल.