आरंभ मराठी / धाराशिव
मला संधी मिळाली नाही म्हणून आमदार – खासदार होऊ शकलो नाही. त्यामुळे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मर्यादा आल्या.पण ज्या पदावर काम केले. त्याठिकाणी अत्यंत समाधानकारक काम केले. खासदार ओमराजे निंबाळकर यांना सांगा पैलवान तयार आहे, असे आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंड थोपटले आहेत.ते म्हणाले, मी 7 वर्षे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी प्रयत्न केले. अगदी भूकंपाच्या काळात देखील अहोरात्र मेहनत करून दुर्घटनाग्रस्तांना मदत केली.त्यामुळे राजकारणातीलच नव्हे तर राजकारणाव्यतिरिक्त लोक माझ्यासोबत आहेत. महायुतीसोबतच महाविकास आघाडी आणि वंचितचे पदाधिकारी लोकसभेसाठी माझ्यासोबत राहण्याचा शब्द देत आहेत. संधी मिळाल्यास जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.लोकसभा मतदारसंघात दाजी फॉर धाराशिव मोहीम राबविण्यात येत आहे.महायुतीमध्ये लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या प्रा.बिराजदार यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अजित पवारांनी सूचना दिल्यामुळे लोकसभेसाठी मतदारसंघात फिरत आहोत. राष्ट्रवादी सोबतच ईतर पक्षाच्या लोकांसोबत संवाद साधत आहे. 1992 पासून झेडपी सदस्यपदापासून जिल्हा बँकेच्या चेअरमनपदापर्यंत अनेक पदावर कामे केली. या काळात सहवासात आलेला प्रत्येक सहकारी आपलासा झाला. सगळ्यांचं म्हणणं आहे, दाजी उमेदवार असतील आम्ही सोबत आहोत. अगदी महविकास आघाडी, वंचितचे सहकारी सोबत आहेत. सगळे साथ द्यायला तयार आहेत.आज उमेदवारी कुणाचीही निश्चित नाही, पण कुणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही ताकदीने प्रचार करू. श्रेष्ठी देतील त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझे सगळ्या पक्षात संबंध आहेत, त्यामुळे मला अधिक पाठिंबा मिळत आहे.आमदारआपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार नाहीत, मग लोकसभेला उमेदवारी कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेजारच्या बीड जिल्ह्यात भाजप किंवा अन्य पक्षाचे लोकप्रतिनिधी असतानाही उमेदवारी दिली गेली.कर्तृत्व कधी सिद्ध करणारं, तसं पदच मिळालं नाही तर मूल्यमापन कसे करणार,असा प्रश्न उपस्थित करून बिराजदार म्हणाले, उमरगा मतदारसंघात 1999 पासून आरक्षण आहे,त्यामुळे संधी मिळाली नाही. जिल्हा बँकेचा 7 वर्षे चेअरमन असताना मी अडचणीत असलेल्या बँकेला अडचणीतून बाहेर काढले.कोर्टात जाऊन थकहमीच्या माध्यमातून पैसे मिळावेत, यासाठी पुढाकार घेतला. तेरणा, तुळजाभवानी कारखान्यामुळे जिल्हा बँक अडचणीत आली होतीस त्यावर पीएफ कार्यालयाने कारखान्याचा लिलाव काढला होता. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात तडजोड करून निकाल आपल्या बाजूने लावून घेतला. दोन वर्षात बँकेला पैसे मिळतील. बँक पूर्णपणे अडचणीतून बाहेर येईल. प्रचंड अडचण असताना ऊस अतिरिक्त झाल्यानंतर आम्ही शरद पवार, अजित पवार यांच्याकडे गेलो, कारखाना सुरू केला. भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या माध्यमातून 27 वर्षे अत्यंत पारदर्शक काम केले. किल्लारी कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला.अडचणीत असलेल्या अनेक कारखान्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रशासनाने 198 विकास संस्था अवसायनात काढल्या होत्या. संचालक मंडळाचा दोष नाही. शासनाला परिस्थिती लक्षात आणून दिली. दिलीप वळसे पाटील यांना विनंती केली. त्यांनी निर्णयाला स्थगिती दिली. 3 वर्षे चालू बाकी असलेल्या शेतकऱ्यांनाच 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा नियम होता. जिल्ह्यातील 55 हजार पैकी 30 हजार सभासद वंचित राहणार होते.आमदार-खासदारांचे हे काम असताना मी मुंबईला गेलो आणि जयंत पाटील, अजित पवारांना भेटलो.जिल्हा बँकेच्या अडचणीचा विषय होता. शेवटच्या कॅबिनेटमध्ये आपल्यासाठी निर्णय बदलला आणि त्याचा फायदा संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना झाला.असा शेतकऱ्यांसाठी अनेक बाजूंनी पाठपुरावा केला.1992 जिल्हा परिषद सदस्य झालो, 1993 ला भूकंप झाला. आमच्या भागात यामध्ये 10 हजार लोक मृत्युमुखी पडले होते. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यापासून पुनर्वसनाची कामे केली. अनेक अडचणी येत होत्या. पण मी स्वतः सिव्हील इंजिनियर असल्याने जागांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करू शकलो. शरद पवार, डॉ.पद्मसिंह पाटील, विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू शकलो.दरम्यान पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धूरगुडे, प्रवीण यादव यांनीही बिराजदार यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट केले.