राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे शरद पवार आणि अजितदादा असे दोन गट पडले आहे. यामुळे दोन्ही गटाकडून संघटनेत बडतर्फीची कारवाई सुरु आहे. नेते भांडत आहे, आम्हा कार्यकर्त्यांची चूक काय? असा सवाल बडतर्फीनंतर कार्यकर्ते उपस्थित करत आहे. दौंड येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्यावर पक्षाकडून बडतर्फीची कारवाई होताच त्यांची मनातली खदखद बाहेर पडली.
पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत माजी आमदार विद्या चव्हाण (vidya chavan) यांनी महिला पदाधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली. तसेच राष्ट्रवादी पक्ष चिन्ह, नाव आणि फोटो वापरु नये, असं देखील सांगण्यात आलं आहे. कारवाईनंतर पक्षाशी 23 वर्ष एकनिष्ठ असणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नागवडे म्हणाल्या, 23 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रामाणिकपणे काम केले. साधारण 2000 साली राजकारणाची आवड लागली. माहेरी किवा सासरी कुठली ही राजकीय पार्श्वभूमी नसताना काम सुरु केले. केडगाव, तालुका दौंड येथे कॉम्प्युटर इन्स्टिट्युटपासून प्रवास सुरु झाला. आदरणीय पवार साहेब व आदरणीय अजितदादा यांचे मार्गदर्शन घेऊन, विद्या प्रतिष्ठान बारामती यांची सी-डॅकची फ्रॅन्चायझी चालवत असताना राजकारणाची गोडी लागली. 2002 साली पहिल्यांदा अण्णासाहेब पटील महामंडळ ह्या ठिकाणी संचालक म्हणून काम पहिले.
2005 साली महाराष्ट्र राज्य सहकारी दुध संघावर संचालक, 2007 साली पंचायत समिती सदस्य ही पदे मिळाली. 2007 साली खासदार सुप्रियातई सुळे ह्या राज्यसभेच्या खासदार झाल्यानंतर त्यांच्याबरोबर दौंड तालुक्यात फिरले. 2009 साली खासदार सुप्रियाताई (Supriya Sule) बारामती लोकसभेवर निवडून गेल्या. त्याच साली 2009 मध्ये पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची संधी मिळालीले. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांच्याबरोबर युवती काँग्रेसच्या स्थापनेपासून महाराष्ट्र भर दौरे केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अनेक चढ-उतार आले, पण हटले नाही. अनेक वेळा अंतर्गत पार्टीमध्ये ही संघर्ष करावा लागला. 2013 साली महाराष्ट्र राज्य दुध संघाची अध्यक्ष झाले. दुर्दैवाने 2014 साली सरकार गेले. 2014 साली भाजप-शिवसेना सरकार असताना आदरणीय एकनाथ खडसे, दुग्ध विकास मंत्री होते. रोज एक नोटीस यायची, पण समर्थपणे त्याला तोंड दिले. वेळप्रसंगी एकनाथ खडसे साहेब यांना वस्तुस्थिती संगितली. त्यावेळेस सुधा आपल्या पार्टीमधले लोक चर्चा करायचे. पण तेच खडसे साहेब पार्टीमध्ये येउन आमदार झाले.
त्यानंतर 2017 साली पुणे जिल्हा परिषद निवडणूक लागली. आदरणीय अजितदादांनी संगितले तुला निवडणूक लढवावी लागेल. 2017 साली राहु – खामगांव गट हा विद्यमान भाजपचे आमदार राहुल कुल यांचा गट. समोर पराभव असताना नेत्यांनी दिलेला आदेश पाळायचा ह्या भुमिकेतून लढले. थोड्या मतांनी पराभव झाला. त्यावेळेस ऑफर असतानाही मी पदासाठी दुसऱ्या पार्टीमधे जाणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक, पुणे जिल्हा दूध संघ ह्या ठिकाणी पार्टीकडून संधी डावलण्यात आली.
परंतु 2014 पासून आजतागायत राष्ट्रवादीसाठी अनेक आंदोलने रस्त्यावर उतरुन केली. दौंडमधे अनेक राजकीय घडामोडी झाल्या. कधी रमेश अप्पा थोरात तर कधी आमदार राहुल कुल पार्टीमध्ये. पण पार्टींनी संगितलंय, तशी कामे करत गेले. दौंडचे राजकारण व्यक्तिभोवती फिरत असताना, मी पार्टी सोडून कधीच काम केले नाही. वेळ प्रसंगी याचा मला तालुक्यात राजकारण करताना तोटा झाला. चित्राताई वाघ व रुपालीताई चाकणकर प्रदेश अध्यक्ष झाल्या तेव्हा अनेक जणांना वाटले मला संधी मिळेल, तरी आशा न सोडता काम करत राहिले.
प्रत्येक जण मला म्हणतात तुम्हाला पार्टीनी बरंच काही दिले, जरुर दिले. पण जसा एखादा पुरुष अनेक वर्ष काम करतो व अपेक्षा करतो त्या पद्धतीने मी ही केली. पुणे जिल्ह्यात साधारण 5 वर्ष लाभाचे पद उपभोगल्यानंतर, संघटनेसाठी, आंदोलनासाठी असा किती वेळ कुठल्या महिलांनी दिला? हे सगळं सहन करायची आजही तयारी होती व आहे. परंतु आज नेते वेगळे झाले, यात कार्यकर्त्यांची काय चुक? आज 23 वर्ष झाले, आमची काय चूक? परंतु आज अभिमान वाटतो, कधी स्वतःच्या स्वार्थासाठी पार्टी बदलली नाही, पण पार्टींनी बडतर्फ केले.
पवार कुटुंब आमचा पक्ष आमची पार्टी. परंतु कार्यकर्त्यावर हा अन्याय नाही का? एका घरात 2 दोन चुली करायला, तुम्ही आम्हाला जबाबदर धरणार का? हा प्रश्न आम्हाला पडलाय. नेत्यांनी अनेक पक्ष बदलेल्या लोकांना पार्टीमधे प्रवेश दिले. मोठ-मोठी पदे दिली, कार्यकर्त्यांनी कधीचं विचारलं नाही, असे का? परंतु आज आमच्या नेत्यांच्या वेगळ्या भूमिकांमुळे कार्यकर्ता भोगतोय. आमचे भविष्य काय? नेते परत कधीही एक होतील, त्यांच्या कामासाठी एकमेकांकडे जातील परंतु सगळं भोगायला लागणार आम्हाला. अनेक मोठी पदे मिळालेले नेते हे वेगळ्या पार्टीमधून आले, त्यांचे जसे नेत्यांनी स्वागत केले तसे आम्ही कार्यकर्त्यांनीही केले. पण कुठलीही ही तक्रार न करता केले, मग आम्ही चुकलो का? असो, आजपर्यंत ज्या-ज्या घटकांनी पार्टीमध्ये काम करण्यासाठी मदत व सहकार्य केले त्या सर्वांची आभारी आहे. एक नवीन सुरुवात, पण अभिमनाने! मी पार्टी सोडली नाही, मला पार्टीमधून बडतर्फ केले.
नेत्यांचे अणि कार्यकर्त्यांचे नाते हे फक्त एका कागदावर असते का? आम्ही तुमच्याशी मनाने जोडलो गेलो , पण तुम्ही आम्हाला एका कागदापर्यंत मर्यादित ठेवले. साहेब कायमच आमचे श्रद्धास्थान आहेत व राहतील. तुम्ही आम्हाला साहेबांचा फोटो वापरु नका, असे सांगीतले. पण आमच्या हृदयात असलेल्या फोटोचं काय? माझ्या मनात प्रत्येक राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल व कार्यकर्त्याबद्दल प्रेम व स्नेह माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिल, आपणही ठेवाल ही माफक अपेक्षा, वैशाली नागवडे यांनी व्यक्त केली आहे.