राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा पगार होईना
आरंभ मराठी / धाराशिव
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गेल्या 3 महिन्यांपासून वेतन न झाल्याने कर्मचारी महासंघाच्या वतीने मंगळवारपासून (दि.२९) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील गाव पातळीपासून शहरापर्यंत सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे.
यासंदर्भात महासंघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांना निवेदन देण्यात आले होते.जिल्ह्यातील ९७० आरोग्य कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत होणार आहे.
महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच प्रशासकिय स्तरावर विविध संवर्गनिहाय अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अभियानातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन दरमहा १ तारखेस अदा करणेबाबत मार्गदर्शक सुचना आहेत.
मात्र, नोव्हेंबरपासून निधी अभावी पगार विलंबाने होत आहे. कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी अवलंबून असल्याने व वेतन विलंबाने होत असल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच त्यांच्या पश्चात कटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
यासंदर्भात प्रशासनाला १५ एप्रिल रोजी निेवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली होती. परंतु अद्यापही वेतन झाले नाही. तीन महिने वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाची भावना आहे. त्यामुळे मंगळवारपासून काम बंद करण्यात येत आहे. निवेदनावर किरण बारकुल, किरण तानवडे,जीवन कुलकर्णी, संतोष कोरपे, सतीश गिरी, संजय मुळे, पवार योगेश, सुनील भुयोरे,पाटील एस.एच, शरद हिंगमिरे, शेख के.एम, माने एस एस, अशोक चव्हाण, शिवकर पी.आर. यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील जवळपास सर्वच सरकारी आरोग्य केंद्रात राष्टीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचारी कार्यरत असून, आंदोलनाच्या या भूमिकेमुळे आरोग्य सेवेवर परिणाम सुरू झाला आहे.