प्रतिनिधी / नळदुर्ग
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सामाजिक न्याय विभाग व परिवर्तन सामाजिक संस्था (नळदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात नशाबंदी मंडळ यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘अंमली पदार्थ विरोधी पंधरवड्या’ची सुरुवात करण्यात आली. या काळात समाजातील विविध घटकात जडलेले व्यसनाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.
नशा बंदी मंडळानी काढलेल्या माहिती पत्रकाचे वाटप हॉटेल- पान टपरी चालक, बांधकाम व्यावसायिक, मिस्त्री, रिक्षा चालक, एस.टी. चालक,ट्रक चालकांसह व्यापारी वर्गात करण्यात आले. यावेळी सर्व प्रकारची दारू, नशा, तंबाखू -सिगारेट, गुटखा तसेच जुगारसारख्या समाज घातक सवयीपासून दूर राहण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले, संस्थेतर्फे समाजात जडलेली खराब सवय सोडविण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याची माहिती परिवर्तन संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी दिली. दरम्यान १२ ते२६ जून या कालावधीत राज्यात अमली पदार्थ विरोधी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नळदुर्ग शहरातील शाळा, कॉलेजमध्ये या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत, बचत गटांच्या महिला, शेतकरी, युवक यांच्यासाठीही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. यावेळी राज्यस्तरीय साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष तथा आदर्श शिक्षक सुनील पुजारी, मारुती बनसोडे, राजेंद्र गुरव यांनी सर्वांना माहिती पत्रक वाटप केले.