शेतजमिनीच्या विक्रीनंतर दिलेला धनाकर्ष वटला नाही, ७० लाखांचे प्रकरण
आरंभ मराठी / धाराशिव
धारशिवच्या एका माजी खासदाराची आर्थिक फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जमीन विक्री केल्यानंतर दिलेला डिमांड ड्राफ्ट अर्थात धनाकर्ष न वटल्याचे हे प्रकरण आहे.
बार्शी शहरातील जमीनीच्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. धाराशिवचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव विठ्ठलराव कांबळे (वय ७४, रा. जामगांव रोड, बार्शी) यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार कांबळे यांची जमीन विक्री करण्यात आली होती, या शेतजमिनीची विक्री करताना त्यांना ७० लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) देण्यात आला होता. मात्र, ड्राफ्ट न वटल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
काय आहे प्रकरण ?
शिवाजी कांबळे यांनी जामगांव येथील गट क्र. १४७/ब मधील १३१ आर जमिनीची विक्री सतीश श्रीमंत आरगडे (रा. तावडी, ता. बार्शी) यांना १ कोटी २४ लाख रुपयांना केली होती. या व्यवहारात आरगडे यांनी २४ लाख आणि २५ लाख रुपये, असे दोन डिमांड ड्राफ्ट दिले. तसेच ५ लाख रुपये थेट कांबळे यांच्या बँक खात्यात जमा केले. कांबळे यांना ५४ लाख रुपये कांबळे मिळाले. मात्र उर्वरित ७० लाख रुपये आरगडे यांनी २१ ऑक्टोबर २०२३ तारखेचा फेडरल बँकेचा डीडी देऊन फेडायचे ठरवले. सातबारा उताऱ्यावर आरगडे यांचे नाव चढवल्यानंतरच डीडी वटवता येईल,अशी अट घालण्यात आली होती. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी कांबळे यांनी या जमिनीचे खरेदीखत करून दिले आणि सातबारा उताऱ्यावर आरगडे यांच्या नावाने फेरफार झाला.
खात्यावर रक्कम नाही
कांबळे यांनी बँकेत जाऊन ७० लाख रुपयांचा डीडी वटवण्यासाठी प्रयत्न केला असता, बँकेने तो डीडी बनावट असल्याचे स्पष्ट केले. यामुळे फसवणूक झाल्याचे कांबळे यांच्या लक्षात आले. कांबळे यांनी तातडीने आरगडे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा आरगडे यांनी काही दिवसांची वेळ मागवून घेतली आणि पैसे रोख स्वरुपात देण्याचे आश्वासन दिले.मात्र कांबळे यांना पैसे मिळालेच नाहीत.
10 महिन्यानंतर तक्रार
तब्बल १० महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने, कांबळे यांनी फेडरल बँकेकडून डीडी खोटा असल्याचे प्रमाणपत्र घेतले. त्यानंतर त्यांनी आरगडे यांच्याविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत, कांबळे यांनी बनावट डीडीद्वारे ७० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे नमूद केले आहे.