प्रतिनिधी / वाशी
दुष्काळ आणि त्यातच दुधाचे ढासळलेले भाव, यामुळे शेतकरी अडचणीत आला असून, दुधाचे भाव वाढवावेत या मागणीसाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. २८) तहसील कार्यालयासमोर दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार नरसिंह जाधव यांना निवेदन देत दुधाला हमीभाव व चारा डेपो सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र अद्याप दुष्काळी उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आपले पशुधन जगविणे कठीण झाले असून चाऱ्यावरचा खर्च वाढला आहे. त्यातच गाय व म्हशीच्या दुधाचे दरही कमालीचे ढासळले आहेत. याचा फटका दूध उत्पादकांना बसत आहे. त्यामुळे शासनाने गाईच्या दुधाला प्रति लिटर किमान ५० रुपये तसेच म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ८० रुपये भाव जाहीर करावा तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात शासकीय चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी या आंदोलन दरम्यान करण्यात आली.
छत्रपती संभाजीराजे चौक येथून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज मार्गे तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मागण्या तात्काळ मान्य न केल्यास लवकरच स्वराज्य पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात जनावरे बांधून व कार्यालयामध्ये दूध ओतून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.
यावेळी स्वराज्य पक्षाचे राकेश उंदरे, सौरभ सुकाळे,अक्षय चेडे,शंभु गायकवाड,गणेश नलवडे,कुणाल कवडे,दिलीप गुंजाळ,अशोक लावंड. शुभम मोरे,रोहित काटकर ,विनायक गायकवाड,प्रविन पारडे,बाळु चेडे,प्रतिक पारडे, सोहेल कवडे, विठ्ठल उंदरे, प्रशांत उंदरे,उमेश ढेंगले,ओमकार कुदळे,महेश लावंड, विष्णू बावकर, गणेश येडे, भारत कवडे, अशोक कुदळे, ओम कुदळे, आमिर काझी, रामराजे कवडे,राज बालगुडे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
तरुणांना मिळतो रोजगार
या आंदोलनात तरुण दूध उत्पादकांचा लक्षणीय सहभाग होता .कारण तालुक्यातील बहुतांश गावात तरुण आता दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. राज्यातील नामांकित जनावरांच्या बाजारासह पंजाब, हरियाणा येथून गाई खरेदी करून तरुणांनी दूध उत्पादन हे रोजगाराचे साधन केले आहे. त्यातच दुष्काळ आणि दुधाचे ढासलेळे भाव परिणामी लाखोंची गुंतवणूक केलेले हे तरुण शेतकरी अडचणीत आले आहेत.