जगदीश मुंडे / चाकूर
महाराष्ट्रातील अत्यंत दुर्लक्षित असलेल्या मसणजोगी समाजाला अयोध्येचे निमंत्रण आले आहे. महाराष्ट्रातून समाजाचे प्रतिनिधी म्हणून लक्ष्मण मुकुटमोरे हे अयोध्येला रवाना झाले आहेत. त्यांना अयोध्येला पाठविण्यापूर्वी चाकूर शहरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
चाकूर (जि. लातूर) येथील लक्ष्मण गोविंदराव मुकुटमोरे यांना प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ढोल ताश्याच्या गजरात उत्साहाने मिरवणूक काढून श्रीराम भक्तांनी शोभायात्रा काढून आयोध्येस पाठविले.
काही दिवसापूर्वीच प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी लक्ष्मण मुकुटमोरे यांना अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडून निमंत्रण आले होते.
कोण आहेत लक्ष्मण मुकुटमोरे?
मसणजोगी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे सरपंच आहेत, या समाजामध्ये राज्याची पंचायत असते. त्या पंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील त्यांच्या समाजातील वाद, विवाद, तंटे मिटवण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून सरपंच या नात्याने लक्ष्मण मुकुटमोरे करतात. अयोध्येत होणाऱ्या नेत्रदीपक सोहळ्याचे निमंत्रण यांना दिले होते. लक्ष्मण मुकुटमोरे यांच्या माध्यमातून आपणच अयोध्येला जात आहोत, अशी भावना प्रभू श्रीराम भक्तामधून व्यक्त होत आहे. यामुळे मसणजोगी समाजामध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्व समाजाने एकत्र येऊन लक्ष्मण मुकुटमोरे यांना अयोध्येला पाठवले.
सोनटक्के यांचे श्रीराम भक्तांना आवाहन
22 तारखेच्या अयोध्येतील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाच्या अभूतपूर्व सोहळ्याचे औचित्य साधून आजपासून पाच दिवस आपापल्या घरासमोर दिपप्रज्वलन करावे, असे आवाहन संघचालक सूरज सोनटक्के यांनी केले आहे. ते म्हणाले, 22 तारखेला गुढी उभारावी व दिवाळीप्रमाणे आनंदोत्सव साजरा करावा, आपल्याला देण्यात आलेल्या अक्षता 22 तारखेला आपल्या जवळील मंदिरात जाऊन मूर्तीला अर्पण कराव्यात किंवा आपल्या देवघरात ठेवून दररोज पूजन करावे, अयोध्येला जाताना त्या घेऊन जाव्यात आणि प्रभू श्रीरामाला मंदिरात अर्पण कराव्यात.
लक्ष्मण मुकुटमोरे झाले भावूक
देशातील एवढ्या मोठ्या ऐतिहासिक क्षणासाठी भटक्या जमातीतील मसणजोगी समाजातील माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला निमंत्रित करून सन्मान दिल्याबद्दल मुकुटमोरे यांना आनंदाश्रू तरळले.