मराठा समाजाच्या वतीने कळंबमध्ये उद्धव ठाकरेंकडे मागणी
आरंभ मराठी / कळंब
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकीकडे मराठा समाज आक्रमक झालेला असताना शिवसेनेच्या उपनेते पदावर असलेल्या लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबद्दल टोकाची विरोधी भूमिका घेतली असून,त्यावर शिवसेनेने कोणतीही कारवाई न केल्याने पक्षाबद्दल संशय निर्माण झाला आहे.त्यामुळे पक्षातून लक्ष्मण हाके यांची हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
उद्धव ठाकरे दोन दिवसांपासून धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत.आज धाराशिव शहरात मराठा आंदोलकांनी त्यांची भेट घेतली.त्यानंतर कळंबकडे जाताना त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
एक मराठा, लाख मराठा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर कळंब येथे सभेसाठी गेल्यानंतर ठाकरे यांना मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे,यासाठी स्पष्ट भूमिका घेऊन शिवसेना उपनेते पदावर असलेल्या लक्ष्मण हाकेला आवर घालावा.
राज्यातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे, हे आपण जाणताच. सर्व पक्ष, सर्व नेते आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगतात पण टिकणारे आरक्षण कसे देता येईल, यावर कुठलाच नेता भूमिका घ्यायला तयार नाही, आपण यावर ठाम भूमिका घेऊन राज्यातील मराठा समाजाला आश्वस्त करावे.
त्याच बरोबर राज्य सरकारकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करून नाहक त्रास दिला जात आहे. या प्रकरणात आपण वैयक्तिक लक्ष घालून मराठा समाजातील तरुणांचे होणारे नुकसान थांबवावे.
हाके यांना हाकला
आपल्या शिवसेना पक्षातील उपनेते पदावर असलेले लक्ष्मण हाके हे वैयक्तिक मराठा समाजावर आपला राग व्यक्त करत असल्याचे दिसत आहे.
पण पक्षाकडून लक्ष्मण हाके याच्यावर कुठलीच कार्यवाही करत नसल्याने मराठा समाजात याबद्दल बरेच संशय निर्माण होत असून यावर आपण आपली भूमिका स्पष्ट करावी,अशी कळंब तालुका येथील सकल मराठा समाजाची मागणी आहे.