मनोज जरांगे यांच्या दौऱ्याची वाशीपासून सुरुवात,वाशीमध्ये सभेची तयारी अंतिम टप्प्यात
पिण्याचे पाणी, पार्किंग व्यवस्था, सभास्थळाची तयारी पूर्ण
विक्रांत उंदरे / वाशी
मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. वाशी शहरात उद्या होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या मैदानावर या ऐतिहासिक सभेचे आयोजन करण्यात आले असून लाखोच्या संख्येने मराठा बांधव सभेत सहभागी होणार आहेत. जरांगे पाटील यांची ही ऐतिहासिक सभा यशस्वी करण्यासाठी शहरासह तालुक्यातील सकल मराठा स्वयंसेवक बांधवानी दिवसरात्र एक करून कंबर कसली आहे.या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे १०० जेसीबीतून फुलांची उधळण केली जाणार आहे तर भाऊसाहेब माळी यांच्या वतीने सुमारे १ टन फुलांचा हार जरांगे यांना घातला जाणार आहे.
सभेच्या ठिकाणी भव्य स्टेज तयार करण्यात आले असून भगवे झेंडे व पताका लावून जरंगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी येणाऱ्या वाहनांची मोठी संख्या पाहता शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था केली असून कन्या प्रश्नाला, MSEB, जगताप माळ, बाजार समिती, ओंकारेश्वर नगर , माळी प्लोटिंग, माऊली पेट्रोल पंप या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सभेसाठी येणाऱ्या समाज बांधवांनी आपापल्या सोयीप्रमाणे वाहने पार्किंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सभेसाठी येणाऱ्या महिलांसाठी तपोवन रोड व पुरुषासाठी कॉलेज रोड राखीव ठेवण्यात आला आहे. सभास्थळ व सभास्थळाकडे येणाऱ्या सर्व मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.विविध संस्था, संघटना, प्रतिष्ठाने, मित्रमंडळ यांच्या वतीने शहरात नाश्त्याच्या व्यवस्था करण्यात आल्या असून किट तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.
जरांगे-पाटील यांच्यावर १०० jcb मधून होणार फुलांची उधळण करण्यात येणार असून, तेरखेडा येथील फटाका असोसिएशन फटाक्यांची अतिषबाजी करणार आहे.