धमक्या आल्या तरी माळी समाज बांधवांकडून जरांगे यांना १ टन फुलांचा हार, शंभरावर जेसीबीवरून फुलांची उधळण
प्रतिनिधी / वाशी
आजोबा पासून नातावापर्यंत पुढाऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्या आपण मोठ्या केल्या पण आपल्या लेकराबाळांना आरक्षणाच्या माध्यमातून मोठ करण्याची वेळ येताच सगळे नेते शांत बसतात. त्यामुळे आपल्या आरक्षणाची लढाई ही आपल्यालाच लढायची आहे. कोणताही नेता आपल्या या लढाईत येणार नाही, असे मनोज जरांगे यांनी येथील सभेत बोलताना सांगितले.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवार (दि. १५) सकाळी अकरा वाजता होणारी सभा रात्री आठ वाजता सुरू झाली. सभेला 9 तास उशीर होऊनही मराठा समाजबांधव सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा उत्साह आणि आनंद कायम होता.यावेळी 100 जेसीबीमधून फुलांची उधळण करत व माळी समाज बांधवांच्या वतीने 1 टन फुलांचा हार घालून पाटील यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे माळी समाज बांधवांना नाशिक भागातून काही लोकांनी सत्कराबद्दल जाब विचारत माळी यांना धमक्या दिल्या होत्या. मात्र बांधवानी धमक्यांना भीक न घालता जारांगे यांचा जंगी सत्कार केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, एकवटलेला मराठा पाहायचा असेल तर या सभेकडे पहा आणि ही गर्दी बघून तरी सरकारने 24 डिसेंबरच्या अगोदर मराठ्यांना आरक्षण द्या. आपल्याला कुणबी मराठा म्हणून ५० टक्क्यातूनच आरक्षण घ्यायचे असून ते मिळणारच आहे. फक्त आपला हा लढा असाच एकजुटीने सुरू राहु द्या आणि एकमेकात मतभेद होऊ न देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपलीच काही लोक आपल्या विरोधात उभी केली जात असून आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आपले आंदोलन शांततेत होऊ द्या , आत्महत्या करू नका आणि गावागावात जाऊन जनजागृती करा, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न मिळाल्यास पुढील रणनीती जाहीर करणार असल्याचे यावेळी सांगितले. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.
जेवणासह व्यवस्था
सभेसाठी आलेल्या समाजबांधवांची गैरसोय होऊ नये याची दक्षता वाशीकरांच्या वतीने घेण्यात आली होती. सभेसाठी आलेल्या समाजबांधवांसाठी दिवसभर चहा, पिण्याचे पाणी आणि जेवणाची व्यवस्था खुप मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. परिणामी सभेला उशीर होऊनही उपस्थितांची गैरसोय टळली.