प्रतिनिधी / धाराशिव
मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील शनिवारी (दि.30) महाराष्ट्र दौऱ्यावर निघत आहेत. त्यांनी त्यांचा राज्य दौरा जाहीर केला असून, 4 ऑक्टोबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील कळंब,येरमाळा करून धाराशिव शहरात मुक्कामी असतील. 5 ऑक्टोबर रोजी समाज बांधवाशी संवाद साधून तुळजापुरात तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन ते पुढे जातील. त्यांच्या दौऱ्याचे जागोजागी भव्य नियोजन करण्यात येत आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे,यासाठी अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण केले होते. त्यांच्या या उपोषणाची दखल घेऊन राज्य सरकारने आरक्षणासाठी एक महिन्याचा अवधी मागितला होता.मात्र सरकारवर विश्वास नाही असे म्हणत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अंतरवाली येथे येऊन लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर प्रोटोकॉल बाजूला ठेवत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न 30 दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले होते।त्यावर जरांगे पाटील यांनी आणखी 10 दिवसांचा कालावधी वाढवून देतो, मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. दोन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे, मात्र आरक्षणाबाबत सरकारची हालचाल किंवा प्रक्रियेत गती दिसत नाही. त्यामुळे आरक्षणाचे पुढे काय होणार,याबद्दल जरांगे पाटील यांच्यासह मराठा बांधवांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळेच 14 ऑक्टोबरला अंतरवाली येथे भव्य मराठा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जरांगे-पाटील आणि सकल मराठा समाज महत्त्वाची भूमिका जाहीर करणार असून,या मेळाव्याबद्दलची महाराष्ट्रभर जनजागृती करण्यासाठी म्हणून स्वतः मनोज जरांगे-पाटील 30 सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जात आहेत. ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आंदोलनाची पुढील दिशा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तसेच 14 ऑक्टोबरच्या मेळाव्यात प्रत्येक जिल्ह्यातून समाज बांधवांनी अंतरवालीत यावे,यासाठी ते आवाहन करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन आज बुधवारी दुपारी जाहीर झाले असून, त्यानुसार ते धाराशिव जिल्ह्यात 4 ऑक्टोबर रोजी मुक्कामी येत आहेत.कळंब,मंगरूळ, मोहा, दहिफळ,येरमाळा, येडशी, त्यानंतर ते रात्री धाराशिव शहरात पोहोचतील. 5 ऑक्टोबर रोजी समाज बांधवांशी संवाद साधल्यानंतर धाराशिव येथून तुळजापूरच्या दिशेने प्रयाण करतील. तुळजापूरमध्ये कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन ते सोलापूरच्या दिशेने रवाना होतील. त्यांच्यासोबत हजारो समाज बांधव उपस्थित असतील. त्यांच्या स्वागतासाठी जागोजागी जय्यत तयारी केली जात आहे.
कोकण, विदर्भात जाणार नाहीत
मनोज जरांगे-पाटील यांच्या 30 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर अशा 13 दिवसांच्या या दौऱ्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याचा समावेश आहे. मात्र त्यांनी विदर्भ तसेच कोकण दौरा टाळला आहे. तसेच पुणे,मुंबई, ठाणे या जिल्ह्यात ही ते जाणार नाहीत. 14 ऑक्टोबरच्या महामेळाव्यात महत्वाची भूमिका जाहीर करण्याची शक्यता असून,त्यामुळे या दौऱ्याकडे आणि मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
जागोजागी मेळावे
जरांगे पाटील यांना प्रत्येक जिल्ह्यांतून दौऱ्यासाठी मागणी होत आहे. मात्र सरकारला दिलेला वेळ कमी असून, मेळाव्याची तयारी करण्यासाठी म्हणून ते 11 तारखेला अंतरवालीला परतणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात जागोजागी तयारी केली जात आहे. काही ठिकाणी समाज बांधवांचे मेळावे, कॉर्नर सभा घेतल्या जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी जिह्याजिल्ह्यात समन्वयक संपर्कात आहेत.