प्रतिनिधी / धाराशिव
मराठा आरक्षणासाठी राज्यातले आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 24 तारखेपासून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने मराठा आंदोलकांना थोपविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेषतः या आंदोलनात ट्रॅक्टरसारख्या वाहनाचा वापर केला जाऊ नये, अशी सरकारची भूमिका असून, त्यामुळेच राज्यातील ट्रॅक्टर मालकांना आंदोलनात ट्रॅक्टर देऊ नका किंवा स्वतः घेऊन जाऊ नका, अशा आशयाच्या नोटीस बजावण्यात येत आहेत.
धाराशिव येथील पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बुधवारी सायंकाळी मराठा संघटनांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आंदोलनात ट्रॅक्टरचा वापर न करण्याचे आवाहन केले. नांदेड जिल्ह्यातील कंधार पोलिसांनी हद्दीतील ट्रॅक्टर मालकांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यात मराठा आंदोलनात ट्रॅक्टरचा समावेश होऊ देऊ नये, असे बजावण्यात आले आहे. अशा स्वरूपाच्या नोटीस अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बजावण्यात येत आहेत. त्यामुळे सरकारने आंदोलनाची धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.
काय म्हटले आहे नोटीसमध्ये
कंधार पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना बजावलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे की,
सध्या महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चालु असुन त्यासंबधाने संपुर्ण राज्यात मेळावे, आंदोलणे, धरणे आंदोलने मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. गोपनीय माहितीनुसार राज्यात मुंबई येथे मराठा आरक्षणासंदर्भात दिनांक 24/12/2023 दरम्यान कार्यकर्ते जमाव होण्याची शक्यता आहे. सदर जमाव जमण्यासाठी राज्यातून विविध भागातुन ट्रक्टरही वाहने मुंबईकडे जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. विविध भागातून ट्रक्टर वाहने मुंबईकडे निघल्यास वाहननांची गर्दी होवुन वाहतुकीस अडथळा निर्माण होवु शकतो. तसेच लोकांची गर्दी जमवून त्यांच्याकडुन जाळपोळ, गाड्या फोडणे, रस्ता आडवणे, रस्त्यावर टायर जाळणे असे प्रकार करुन सार्वजनिक शांतता भंग होवुन मोठ्या प्रमाणात जिवीतहानी, शासकीय मालमत्तेचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे व त्यावरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सामान्य जनजिवन विस्कळीत होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
आपणाकडे असलेले ट्रक्टर आपण शेतीच्या उपयुक्त कामासाठी घेतले आहे. त्याचा वापर आपण शेतीच्या उपयुक्त कामासाठीच करावा. आपल्याकडे कोणीही मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते, नागरीक ट्रॅक्टरच्या मागणीसाठी आल्यास आपण त्यांना आपले ट्रॅक्टर देवू नये, अगर स्वतः ट्रॅक्टर सोबत घेवुन जावू नये. आपण त्यांना ट्रॅक्टर पुरवल्यास किंवा स्वतः घेवून गेल्यास आरक्षण संबंधाने गर्दी होवुन वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास तसेच लोकांची गर्दी जमुन त्यांच्याकडुन जाळपोळ, गाड्या फोडणे, रस्ता अडवणे, रस्त्यावर टायर जाळणे असे प्रकार घडुन सार्वजनिक शांतता भंग होवुन जिवीतहानी, शासकीय मालमत्तेचे नुकसान होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला किंवा एखादा दखलपात्र स्वरुपाचा गुन्हा घडला तर त्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून आपल्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल व ट्रॅट्रक्टर जप्तीची कार्यवाही करण्यात येईल व सदरची नोटीस पुरावा म्हणुन ग्राह्य धरण्यात येईल.
धास्ती कशासाठी ?
दिल्लीत शेतकरी आंदोलनाने सरकार आणि नागरिकांची अडचण झाली होती. कारण त्या आंदोलनात ट्रॅक्टरचा मोर्चा काढण्यात आला होता. काही ट्रॅक्टर पोलिसांनी लावलेले संरक्षण कठडे तोडून आत घुसले होते. परिणामी चेंगराचेंगरी झाली होती. मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन होण्याची शक्यता असून, त्यात ट्रॅक्टरचा समावेश झाला तर सरकार आणि नागरिकांची अडचण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर नोटीस देण्यात येत आहेत.