ज्ञानेश्वर पडवळ / उपळा
महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मोठी चळवळ उभी राहिली आहे.गावागावात आरक्षणासाठी वेगवेगळ्या माध्यमातून लक्षवेधी आंदोलन सुरू झाले आहेत.आता कुणब्याला अर्थात शेतकऱ्याला जगवणाऱ्या आणि शेतकऱ्यांचा खरा आधार असलेल्या बैलांनी देखील मराठा आरक्षणाला साथ दिल्याचे पाहायला मिळत आहे.
खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आधार असलेल्या, त्याच्याशी इमान राखणाऱ्या बैलांचा सण अर्थात ‘बैलपोळा’ गुरुवारी साजरा करण्यात आला. गेल्या पिढ्यान् पिढ्या कुणब्याच्या घरात कुणबी म्हणूनच जन्मलेल्या, कुणबी म्हणूनच हयातभर आपल्या जिरायती रानात राबलेल्या, कष्टलेल्या आणि त्याच मातीत मिसळून माती होऊन गेलेल्या कुणब्याच्या पोराला आज ‘कुणबी’ म्हणून घेण्यासाठी सुद्धा झगडावे लागत आहे. ‘कुणबी’ असल्याचा सरकारी पुरावा मिळवून हक्काचं असलेलं आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी अन्न-पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसावं लागत आहे, म्हणूनच उपळा गावातील ही मुकी जनावरंही आपल्या मालकाच्या न्याय्य हक्कासाठी जणू त्याला समर्थन देत आहेत. पोळ्यानिमित्त सजवलेल्या बैलांच्या पाठीवर ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ हे घोषवाक्य रंगविण्यात आले.हे बैल गावात साखळी उपोषणस्थळी दाखल झाले.
अंतरवली सराटी येथील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेल्या तीन दिवसांपासून उपळे (मा) येथे साखळी उपोषण सुरू आहे. रोज सहा जण उपोषणाला बसत आहेत. उपळा गावातून तसेच परिसरातून या उपोषणास मोठा प्रतिसाद मिळत आहे. येथील उपोषणकर्त्यांस आज या बैलांचंही अनोखं समर्थन मिळालं, याबद्दल सर्वत्र याचं कौतुक होत आहे. या मुक्या जनावरांना जे कळालं ते राज्यातील आणि देशातील राज्यकर्त्यांना केव्हा कळणार? असा सवालही ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.