प्रतिनिधी / धाराशिव
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन पेटत असून, अन्य समाजातूनही मराठा आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी, पक्षांनी तातडीने भूमिका जाहीर करावी आणि समाजाला पाठिंबा द्यावा अशी मागणी होत आहे. या मागणीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ग्रामपंचायतीकडून लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांनी लोकप्रतिनिधींना गावबंदी केली आहे. त्यात आता नगर पंचायत असलेल्या शहरानेही असाच निर्णय घेतला असून, त्यामुळे लोकप्रतिनिधींवर दबाव वाढला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील manoj jarange patil गेल्या आठवड्यात जिल्ह्यात येऊन गेले. त्यांच्या दौऱ्यानंतर वातावरण ढवळून निघाले असून, जिल्ह्यातील अनेक गावांनी 14 तारखेला अंतरवाली सराटी येथे जाण्याचे नियोजन केले आहे. मात्र लोकप्रतिनिधींची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्यासाठी वेगवेगळ्या गावांनी आता थेट लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यास सुरुवात केली आहे. भूम तालुक्यातील 20 हजार लोकसंख्या असलेल्या ईट गावाने दोन दिवसांपूर्वीच असा निर्णय घेतल्यानंतर आता वाशी नगर पंचायतीने अशा प्रकारचा थेट ठराव घेतला असून, असा ठराव घेणारी राज्यातील ही पहिलीच नगर पंचायत आहे.
मराठा आरक्षण मिळेपर्यंत मंत्री, आमदार, खासदार यांना शहरबंदी
विक्रांत उंदरे / वाशी
मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह वरिष्ठ नेतेमंडळी यांना शहरात प्रवेश बंदीचा ठराव येथील नगरपंचायतने सर्वानुमते मंजूर केला. उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांनी ठराव मांडला व गटनेते नागनाथ नाईकवाडी यांनी ठरावास अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने प्रवेश बंदीचा ठराव मंजूर केला.
मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. मागणीला पाठिंबा देण्यासाठी जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह वरिष्ठ नेतेमंडळी यांना गावात प्रवेश बंदीचे ठराव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी घेतले आहेत. त्याच अनुषंगाने इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तोपर्यंत वरिष्ठ नेतेमंडळी यांना शहरात प्रवेश बंदी करण्याचा ठराव येथील नगरपंचायत च्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने पारित केला.