पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / मुंबई
येणाऱ्या पावसाळी अधिवेशननात मराठा आरक्षणवरून सरकारला घेरण्याची तयारी मराठा समाज बांधवांकडून सुरू झाली आहे.त्यामुळे एकीकडे झालेल्या राजकीय घडामोडी आणि मराठा आंदोलन यामुळे यावेळचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या समाज बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असून,त्यामुळे समाजात रोष वाढत आहे. त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी समाजबांधवांनी येत्या 17 जुलै रोजी आझाद मैदानावर एकत्र येऊन आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाज आपल्या ओबीसी आरक्षण मागणीसाठी आक्रमक झाला असून मुंबईसह राज्यात आंदोलन मोठे करण्यासाठी हलचाली सुरू झाल्या आहेत. 17 तारखेला पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून पहिल्याच दिवशी मराठा समाज मुंबईमध्ये धडकणार आहे. त्यासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक सकल मराठा समाज भवन, चुना भट्टी मुंबई येथे पार पडली. सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे सक्रिय पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते. ओबीसीमधून आरक्षण कसे मिळेल, यावर यावेळी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीला मराठा वनवास यात्रेचे आयोजक योगेश केदार यांनी मार्गदर्शन केले.
योगेश केदार म्हणाले, पुन्हा एकदा राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका समोर आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यकर्त्यांना ओबीसी आरक्षण मान्य करण्यास भाग पाडू. कर्नाटकमध्ये केवळ 17% लिंगायत समाजाने भाजपची सत्ता घालवली. आम्ही तर महाराष्ट्रात 32% पेक्षा जास्त आहोत. मग मराठे किती गोंधळ घालतील याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा. यावेळी संघटित स्वरूपात सर्वच पक्षांवर मताच्या माध्यमातून वचक ठेवली जाईल. जो पक्ष आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण देईल त्यालाच मतदान अन्यथा त्या पक्षाचा बहिष्कार करण्यासाठी मराठे सज्ज आहेत.
..आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही
मराठा वनवास यात्रा गेले अनेक महिने ओबीसी आरक्षण मागणीसाठी जनजागृती करत आहे. त्यातील संपूर्ण मे महिना भर उन्हात पायी चालत तुळजापूर वरून निघत 6 जूनला मुंबई गाठली. आणि त्यानंतर एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून मराठा बांधव आझाद मैदानावर भर पावसात ठाण मांडून बसले आहेत. तरीही सरकारला जाग येत नाही. त्यामुळे मराठा समाजात रोष निर्माण झाला असून, तो वाढत चालला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण घेतल्याशिवाय मराठा मुंबई सोडणार नाहीत,अशी प्रतिज्ञा मराठा समाजाने केली आहे. बैठकीला प्रीतम माने, मनोज भोसले दादा सूर्यवंशी बाबू फडतरे,भरत तावरे, रोहिदास काटकर,सचिन थोरात,मानसिंग कापसे, बाबुराव मोरे, विनोद जाधव, स्वप्निल एरुणकर, महेंद्र शिंदे,प्रकाश साळुंखे, प्रशांत भोसले, गौरव फडतरे,रामदास पवार, मोहन माने,कुबेर मच्छिंद्र पवार, पोपट बळी, सकल मराठा समाज चुनाभट्टी सर्व कार्यकारणी आणि सदस्य उपस्थित होते.